Breaking News

वडाळे तलाव, पुतळे सौंदर्यीकरणाचा मार्ग मोकळा

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महापालिका हद्दीतील वडाळे तलाव, तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या सौंदर्यीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या कामांना स्थायी समितीच्या सभेत शुक्रवारी (दि. 1) मंजुरी देण्यात आली. आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिकेत विकासकामे सुरू असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष मनोहर म्हात्रे यांनी सांगितले.

पनवेल मनपाच्या स्थायी समितीची तातडीची सभा शुक्रवारी सकाळी 11.30 वा. अध्यक्ष मनोहर म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेस सभागृह नेते परेश ठाकूर, अमर पाटील, तेजस कांडपिळे, गोपीनाथ भगत, सीता पाटील, वृषाली वाघमारे, प्रमिला पाटील, आरती नवघरे आदी उपस्थित होते.

या सभेत वडाळे तलावाचे सुशोभीकरणाचे मे. देल्ट टेक्स कन्स्ट्रक्शन प्रा.लि. यांच्या 10 कोटी 74 लाख रुपयांच्या टेंडरला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे पनवेलकरांना लवकरच वडाळे तलावाचे सौंदर्यीकरण झालेले पाहायला मिळेल. या वेळी शेकापच्या हेमलता गोवारी यांनी बीओटी तत्त्वावर काम द्यावे, अशी मागणी केली, मात्र त्यांना स्वपक्षीयांचाही पाठिंबा मिळाला नाही.

छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सौंदर्यीकरणासाठी मे. सोनाली कन्स्ट्रक्शन यांच्या न्यूनतम एक कोटी 42 लाख 54 हजारांच्या निविदेला मान्यता देण्यात आली. यात डॉ. आंबेडकर पुतळ्याची त्याच जागी उंची वाढवणे आणि दोन्ही पुतळ्यांच्या परिसराचे सौंदर्यीकरण करण्याची तरतूद आहे. याबरोबरच नगरसेवकांच्या मागणीवरून मनपा हद्दीतील उद्यानातील खेळणी आणि बाकडी बसवण्याच्या कामालाही मान्यता देण्यात आली.

उपकरणे आणि मनुष्यबळ, तसेच सक्शन कम जेटिंग मशीन वापरून मनपाहद्दीतील भुयारी गटार लाईनचे परिचलन करण्यासाठी तीन निविदा आल्या होत्या. त्यापैकी मे. ओम ऑटो गॅरेज यांची न्यूनतम निविदा आली आहे, पण त्यांच्याकडे शासकीय किंवा निमशासकीय कामाचा अनुभव नसल्याने ही निविदा सत्ताधारी पक्षाने बहुमताने नामंजूर केली. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मे. ओम ऑटो गॅरेज यांनी जोडलेल्या खोट्या दाखल्यांची चौकशी करण्याचीही मागणी केली.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply