पनवेल ः रामप्रहर वृत्त
व्यवस्थेने नाकारलेल्या, गावकुसाबाहेर राहणार्या उपेक्षित, वंचित बहुजन समाजाला पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या दूरदृष्टीने स्थापित केलेल्या रयत शिक्षण संस्थेमुळेच शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील होता आले व आपली विद्वत्ता सिद्ध करता आली, असे प्रतिपादन गव्हाण येथील संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमधील आंग्लभाषा अध्यापक सागरकुमार रंधवे यांनी केले. संस्थेच्या पनवेल तालुक्यातील पळस्पे येथील मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाच्या छत्रपती शिवाजी विद्यालयात आयोजित 132व्या कर्मवीर जयंती सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन रवींद्रशेठ चोरघे यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी व अध्यापकांनी गुणवत्ता वृद्धीसाठी अधिक परिश्रम घ्यावेत, असे आवाहन केले. चेअरमन भाई सावंत, महेंद्रशेठ गवंडी, रमेश गवंडी, उपसरपंच रेखा दामोदरे, दमयंती भगत, जयश्री पाटील, राधताई, शालिनी ठाणगे, निरंतर पाटील, पर्यवेक्षिका जे. आय. मिन्न उपस्थित होते. पी. जी. पाटील यांनी आभार मानले.