पाली ः प्रतिनिधी
अष्टविनायक देवस्थानांपैकी एक बल्लाळेश्वराचे स्थान असलेल्या पालीत नाताळच्या सुटीनिमित्त मोठी गर्दी होत आहे. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. हजारोंच्या संख्येने भाविक व त्यांची वाहने दाखल होत असल्याने वाहतूक कोंडी झाली होती.
नाताळपासून सुरू झालेली भाविकांची गर्दी थेट जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राहील. कारण नाताळच्या सुट्या, नवीन वर्षाचे स्वागत, विविध सहली आणि 28 जानेवारीला असलेला माघी गणेशोत्सव यामुळे आगामी सव्वा महिना पालीत भाविकांची प्रचंड गर्दी राहणार आहे. भाविकांची मोठी गर्दी असल्याने येथील दुकानदार व हॉटेल व्यावसायिकांचा धंदादेखील तेजीत होता. परिसरातील दुकाने व हॉटेल्स ग्राहकांनी गजबजली होती. परिसरातील हॉटेल, खेळण्याची व शोभिवंत वस्तूंची दुकाने, नारळ, हार, फुले व पापड मिरगुंडे, कडधान्य विक्रेते, प्रसाद व पेढेवाले जय्यत तयारीत होते. मंदिर परिसरात मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. बल्लाळेश्वर मंदिर परिसरात रानभाज्या, फळे, कंदमुळे व रानमेवा घेऊन अनेक विक्रेत्या बसल्या होत्या.
देवळात येणारे भाविक आवर्जून येथून हा रानमेवा खरेदी करीत होते. त्यामुळे या विक्रेत्यांचा धंदा चांगला झाला. पालीत दाखल झालेल्या भाविकांच्या गाड्यांमुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पाली पोलीस व बल्लाळेश्वर देवस्थानचे सुरक्षारक्षक वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करीत होते. भाविकांच्या सोयीसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती. अशातच वाहतूक कोंडीची समस्याही गंभीर झाली. खासगी, अवजड व लक्झरी वाहनांची ये-जा, नियमांचे उल्लंघन करणारे चालक, अरूंद रस्ते व रस्त्याच्या दुतर्फा लावलेली वाहने व बांधकामे यामुळे पालीत सतत वाहतूक कोंडी असते. सुट्यांच्या काळात तर मोठ्या प्रमाणात पर्यटक व भाविक पालीत दाखल होत आहेत. या वाहनांमुळे पालीतील वाहतुकीवर प्रचंड ताण येऊन वारंवार अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नाक्यावर वाहतूक पोलीस तैनात असूनदेखील अरुंद रस्ते, अवजड वाहतूक, एकेरी वाहतुकीवरून दुहेरी वाहतूक आणि वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम न पाळल्याने व रस्त्याच्या दुतर्फा अवैधरीत्या पार्क केलेली वाहने यामुळे पोलिसांना या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविणे अवघड होते. बल्लाळेश्वर मंदिर परिसरात बल्लाळेश्वर देवस्थानचे सुरक्षारक्षकही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तैनात आहेत, मात्र सर्वच ठिकाणची वाहतूक कोंडी वाहतूक पोलिसांना सोडविणे शक्य होत नाही.
देवस्थानच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी थंड पाण्याची व्यवस्था केली आहे. नाममात्र दरात प्रसादालयात भोजन उपलब्ध आहे. भाविकांसाठी दोन सुसज्ज भक्तनिवास आहेत, तसेच सुसज्ज स्वच्छतागृहही उभारण्यात आले आहे.
-अॅड. धनंजय धारप, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली
नाताळच्या सुट्या असल्याने आता मोठ्या प्रमाणात भाविक बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी येत आहेत. येथे भाविकांची गर्दी असल्याने व्यवसायदेखील चांगला होतो.
-राजेश बेलोसे,
हॉटेल व्यावसायिक