Breaking News

भावॠतूंची ‘गजलवेल’

वृक्ष आणि वेल यांच्यात समानता व पृथकता दोन्ही असतात. वृक्ष अन् वेली बहरतात, पण उत्तुंगतेकडे वृक्षापेक्षा वेलीच  भरारी घेतात. मराठी पद्यवृक्षाच्या कवेतून बहरलेली गजलेची वेल आता गगनाकडे झेपावून आपल्या तरल रंग गंधाने अवघा रसिक परिसर व्यापते आहे.

पनवेलचे ज्येष्ठ गजलगुरू ए. के. शेख यांनी पनवेलच्या गजलकारांच्या प्रातिनिधिक गजलांचा हा संग्रह ‘गजलवेल’ या तरल शीर्षकाने संपादित केला आहे. यातील सारेच ‘ए. के. स्कूल ऑफ गजल’चे सृजनकार आहेत. आपल्या मांदियाळीतील गजल सर्जन मराठी वाचक, श्रोत्यांना अवगत व्हावे ही सदिच्छाच या संपादनामागे कार्यरत असावी. ‘आपुल्या सारिखे। घडावे स्वजन। मंत्र तंत्र तया। देऊनिया।’ हे ए. के. गजल संप्रदायाचे ब्रीदच असावे असे दिसते. प्रेयस अनुभूतीच्या विविध भावच्छटा, मीलन, विरहातील हुरहूर, आर्तता, स्वप्नीलता, रुसवे फुगवे अशा विविध संवेदना या गजलांतून अलवारपणे उमलतांना दिसतात. मानवी जीवनातील ‘प्रेम’या संज्ञेची विश्वव्यापकता व सखोलता सूत्ररूपात अभिव्यक्त करण्याची असामान्य क्षमता शेरात असते.अन् अशा बहुरंगी शेरांची सुगंधित माळच ‘गजल’ संबोधली जाते. काही तरल शेर ऐका-

चांदण्याचा असे पूर हा अन् फुलांचा बहर दरवळे पौर्णिमा दाटलेली उरी

वेच आनंद दुनियेतला वेच किरणे फुलांच्या परी, गे तुझ्या का मनी काजळी

ए. के. शेखांचा हा शेर एक परिपूर्ण कवितेसह संगीतात्मक हळवेपण लेऊन आलाय. ‘मत्तमातंग दंडक’ या विरळ्याच वृत्तातल्या गजलचा हा शेर भुरळ पाडतो.

रक्तवर्णी ओठ सुंदर हासते, मान वेळावुन जराशी लाजते

भान हरवुन पाहतो मीही तिला, स्वप्नलोकीची जशी ती सुंदरा

आबिद मुनशी मराठी गजलचे एक आश्वासक नाव आहे. तरल गजलेसह प्रबोधनात्मक शेरही त्यांच्या गजलेत आढळतात.

ॠतुरंग साजरे झाले दिन आले गेले सरले

रंगात विरून जाण्याचे उरले न ॠतू ते आता

दिवाकर वैशंपायन यांच्या सहज सर्जनातला हा नॉस्टेलजिक भाव गीतशैलीचा आहे.

गणेश म्हात्रेची गजलदेखील पारंपरिक शैलीशी नाते सांगते.

अंतरीचे प्रेम सारे गे तुला मी देत आलो

घासलेल्या चंदनाचा गंध दरवळलाच नाही

पूर्वस्मृतीचे आगमन ही गजलची खासियत. मीनल वसमतकर व पूजा नाखरेंचे शेर या संदर्भात उल्लेखनीय आहेत.

गावाच्या त्या ओढ्याकाठी कधी चालता

बालपणीचे खेळ गवसले पुन्हा एकदा

-मीनल वसमतकर

पडद्याच्या हलण्याने वाटे की तू आला

अन् मग कळलेकी तो माझा भासच होता

-पूजा नाखरे

अज्ञात ‘तो’चा मागोवा, अनभिज्ञतेचे निवारण आदी विषय गजलेत नेहमीच दाखल होत आलेत. वेळोवेळी शायरांनी त्यांस नवीन डायमेंशनने कसे पेश केले ते पहा-

पसारा मांडला सारा असा आकाशगंगेचा

तुझा हा खेळ खेळीया कितीकां भिववितो आहे

-प्रभाकर गोविंद गोगटे

अज्ञानाचा तम निवळुनिया उजळुन गेले दालन

तेवत होत्या तेथे जेव्हा ज्ञानाच्या त्या ज्योती

-रंजना करकरे

जन्म, मृत्यूमधील अंतर हेच आयुष्य म्हटले तरी त्यातील अनाकलनीय गूढ रोहिदास पोटे सरांच्या शेरातून उलगडते ते असे-

मरणाने सुटले नाही जगण्याचे कोडे अवघड

जगण्यातच सुटते सारे मरण्याचे कोडे अवघड

जीवनाचं अंतिम सत्य गजलच सांगते. किंबहुना गजलकार अंतिम सत्याचा शोध घेत असतो. बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व या जीवनातील तीन महत्त्वाच्या न टाळता येणार्‍या पायर्‍या. आयुष्याच्या सायंकाळी सांजवात तेवताना जीवनाचे म्हणजे जगण्याचे कोडे कसे सोडवावे, हा प्रश्नच समीर शेख यांनी आपल्या एका शेरात विचारला आहे-

सोडुन गेली पाखरे अता चरावयाला

जगण्याचे कोडे अवघड हे कसे सुटावे?

‘स्वत:साठी जगलास तर मेलास आणि दुसर्‍यासाठी जगलास तर खर्‍या अर्थाने जगलास’ हाच उदात्त विचार डॉ. अविनाश पाटील यांनी एका सुंदर शेरात व्यक्त केला आहे-

नसते येथे जगणे केवळ पोटासाठी

डोळ्यामधले थेंब कुणाच्या पुसता आले

दुःखितांचे अश्रू पुसण्यातच जीवनाची खरी पूर्ती असते.

माणसाचं आयुष्य म्हणजे दोन घडीचा डाव असतो. डाव म्हटलं की हारजीत आलीच, परंतु जीवनाच्या एका वैशिष्ट्याविषयी बोलताना पत्रकार संदीप बोडके आपल्या एका शेरात समर्पक विचार मांडून जातात. शेर असा-

दोन घडीचा डावच आहे जगणे सारे

जिंकत तोची गेला ज्याला हरता आले

ज्याची हरण्याची तयारी असते त्यालाच जिंकता येते हे सुंदर सत्य त्यांनी शब्दांत मांडले आहे. कवी काय गजलकार काय, तो मानवी जीवनातील सुखदुःखांचा भाष्यकार असतो. गजलकार दोन ओळीच्या एका शेरात खूप काही सांगून जातो. सुखाला संयमाची आणि दुःखाला सहनशीलतेची झालर लावण्याचे काम गजलकार करतो. सुनीती साठे यांचा हा शेर पाहा-

‘सुनीती’ जरी रुक्ष आयुष्य हे

तरी नेमके रंग भरतेस तू

दुःखाला सुख आणि रुक्षतेलाही विविध रंग भरण्याचे काम कवीच करतो. सुनीती साठे यांच्या मक्त्याच्या शेराने ही सुंदर जादू केली आहे.

दुःखावर काळासारखे औषध नाही आणि काळ आयुष्याच्या काही गणितांची मांडणी करतो. आयुष्याचे गणित आणि काही सत्य काळच सांगतो. सदानंद रामधरणे यांचा हा शेर तटस्थ जीवनदृष्टी सांगून जातो-

क्षण आठवती सोनेरी आठवणी जाग्या होती

मस्तीत परी जगण्याचे उरले न ऋतू ते आता

सतिष अहिरे हा गजलवेल मधला सर्वात तरुण गजलकार. अतिशय सुंदर व तरल भावना आपल्या सखीविषयी बोलताना व्यक्त करतो. सखीचं चित्र मनातल्या मनात रेखाटताना तो मनातल्या धुंदीतच स्वतःला हरवून जातो आणि मनातल्या मनातच म्हणतो-

असाच धुंद राहतो मनातल्या मनात मी

तुझेच चित्र रेखितो मनातल्या मनात मी

गजलवेल म्हणजे पनवेलच्या 15 गजलकारांची एक सुंदर हसरी जीवनवेलच आहे. ए. के. शेख या गुरूंच्या अनुभूतीतून या गजलवेलची निर्मिती झाली आहे. हा नजराणा रसिक मनांचा ठाव घेईल एवढे मात्र निश्चित. गजल हा एक आत्मसंवाद असतो, एक आत्मविश्लेषण असते, एक आत्मचिंतनही असते, कवीचे, कवींद्वारे, कवीहृदयांसाठी. वाचक अथवा श्रोता कवी अंतःकरणाचा नसेल तर तो गजल ऐकेल, पण त्यातील भावनेची प्रचिती त्याच्या हृदयाला येणे अशक्य. हे तादात्म्य, ही तदाकारता रसिक मनालाच साधते.

मराठी गजल दिवसेंदिवस परिपक्व होत आहे. विशेष म्हणजे ती रसिकांच्या आकलनकक्षेत अद्यापही असल्याने समकालीन कवितेप्रमाणे अवाचनीय अथवा अश्रवणीय झालेली नाही. संप्रेषणीयता हा तिचा गुणच तिच्या मोहात पाडतो अन् सूत्रबद्धता व मनबुद्धीचा ठाव घेण्याची उत्तम शेरांची क्षमता गजलेला पद्यविश्वात अग्रस्थान प्रदान करतात. संकलन म्हटले की त्यातील रचनांचा स्तर एकसारखा असेलच असे नसते. वाचकांची आवडही व्यक्तीपरत्वे भिन्न असते. इथे या गजलवेलीला विविधरंगी फुले आली आहेत, त्यांचा पुष्पगुच्छ स्नेहादरपूर्वक ए. के. शेखांनी पेश केला आहे. त्याचा सानंद स्वीकार करणे हेच आपण रसिकांच्या हाती आहे.

-डॉ. राम पंडित ‘पद्मानन्दन’, नवी मुंबई

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply