Wednesday , June 7 2023
Breaking News

शासनाचा महसूल बुडवून गौण खनिजाची वाहतूक; ट्रकचालकाचा महसूल अधिकार्‍यांना चकमा

पनवेल ः वार्ताहर

शासनाचा महसूल बुडवून अवैध मार्गाने खडीची वाहतूक करून ट्रक घेऊन जाणार्‍या चालकाने महसूल विभागाच्या अधिकार्‍यांना चकमा देऊन ट्रकसह पलायन केल्याचा प्रकार तळोजा येथे घडला आहे. या ट्रकचालकाविरोधात तळोजा पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. काही टोळ्या या गौण खनिजाचे अनधिकृतरित्या उत्खनन करून शासनाचा महसूल बुडवून बेकायदेशीररीत्या वाहतुक करून नेत असल्याची माहिती मिळाल्याने रायगडच्या जिल्ह्याधिकार्‍यांनी अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी उरण-बेलापूर मार्गावर वहाळ तसेच कळंबोली टी पॉइंट व तळोजा मेट्रो ब्रिजखाली रॉयल्टी तपासणी बूथ तयार केले आहेत. या बूथवर महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचार्‍यांचे पथक 24 तास तैनात करण्यात आले आहे. पनवेल येथून कल्याणच्या दिशेने जाणारा खडीने भरलेला ट्रक तळोजा मेट्रो ब्रिजखाली असलेल्या रॉयल्टी तपासणी पथकाने अडवून ट्रकचालक जयहरी सिंगकडे चौकशी केली असता त्याने खडीची रॉयल्टी व परवाना नसल्याचे सांगितले. या वेळी तेथे जमा झालेल्या इतर लोकांनी महसूल अधिकार्‍यासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. या दरम्यान खडी घेऊन जाणार्‍या ट्रकचालकाने महसूल अधिकार्‍यांची नजर चुकवून खडीने भरलेला ट्रक घेऊन पलायन केले. याबाबत महसूल अधिकार्‍यांनी तक्रार दाखल केल्यानंतर तळोजा पोलिसांनी ट्रकचालकावर गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

Check Also

जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी भाजपच्या चार जणांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी …

Leave a Reply