खोपोली ः प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित झाल्याने खोपोली शहरातील रस्ते निर्मनुष्य आहेत. वाहनांची संख्याही ठप्प झाली. या संधीचा फायदा घेऊन खोपोली नगरपालिकेने शहरातील प्रामुख्याने जे रस्ते फारच खराब व दयनीय अवस्थेत आहेत त्या रस्त्यांतील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
शहरातील बहुतेक सर्वच रस्त्यांमध्ये खड्डे पडले आहेत. पूर्वी लहान दिसणार्या खड्ड्यांनी पावसाळ्यात महाकाय स्वरूप धारण केले आहे. रस्त्यातील खड्ड्यात तुंबलेल्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे वाहने जोरात आपटल्यामुळे किरकोळ अपघातांची मालिका सुरू आहे.
दुचाकी वाहनांच्या बाबतीत टायर पंक्चर, एखादा पार्ट निकामी होणे यांसारखे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. लॉकडाऊनमुळे दुकाने बंद असल्याने अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडलेल्या दुचाकीस्वारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.