आपल्या देशभरातील सर्व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सुरूवात दीपप्रज्ज्वलनाने होते. याबद्दल गेल्या 70 वर्षांत कुणी ही हिंदू धर्मियांची प्रथा सरकारी कार्यक्रमांमध्ये का पाळली जाते असा सवाल केल्याचे ऐकिवात नाही. याचे एकमेव कारण दीपप्रज्ज्वलन हा भारतीय संस्कृतीचा भाग आहे हे आहे.
फ्रान्सकडून भारताच्या हवाई दलासाठी खरेदी करण्यात आलेल्या 36 पैकी पहिल्या राफेल विमानाचा औपचारिक ताबा मंगळवारी भारताला मिळाला. फ्रान्समधील दसॉल्त एव्हिएशन प्रकल्पस्थळी म्हणजे राफेल बनवणार्या कंपनीच्या आवारात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत राफेल हस्तांतरण सोहळा पार पडला. या वेळी फ्रान्सचे संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ली देखील उपस्थित होते. राजनाथ सिंह यांनी राफेलचा ताबा घेण्यापूर्वी या शस्त्ररूपी विमानाचे विधिवत शस्त्रपूजन केले. त्यांनी कुंकवाने विमानावर ओम रेखाटून विमानाला फुले तसेच नारळ वाहिला. या वेळी संबंधित राफेल विमानाच्या चाकांखाली दोन लिंबेही ठेवण्यात आली. वास्तवत: कुठलीही मोठी नवी वस्तू विकत घेऊन घरी आणताना तिची साग्रसंगीत पूजा करावयाची हा भारतीय संस्कृतीचा भाग आहे. परंतु काँग्रेस पक्षाने यासंदर्भात सरकारवर टीका करताना राफेल व हिंदू धर्मातील पूजाविधींचा काय संबंध असा सवाल केला आहे. डाव्या विचारसरणीच्या लोकांकडूनही समाजमाध्यमांवर यासंदर्भात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. सरकार निव्वळ हिंदू धर्मीय रीतीरिवाजांचे पालन का करते आहे? आपले राष्ट्र धर्मनिरपेक्ष असल्याचे राज्यघटनेत नमूद करण्यात आले आहे, आदी मुद्दे समाजमाध्यमांवर काही जणांनी उपस्थित केले आहेत. वास्तवत: नव्या वस्तूचा प्रथमच स्वीकार करताना तिला हळद, कुंकु वाहण्यामागे निव्वळ मांगल्य व शुभ संकेत आदी सकारात्मक भावनांचा स्पर्श त्या वस्तूला व्हावा असा विचार असतो. याचा संबंध हिंदू धर्मापेक्षाही भारतीय संस्कृती व परंपरा यांच्याशी आहे. भारतीय संस्कृतीत हिंदू प्रथा-परंपरांचा प्राधान्याने समावेश असणे कुणीही कसे नाकारू शकेल? देशातील अनेक राज्यांमध्ये अन्य धर्मियांनीही या प्रथा-परंपरांचा खुल्या मनाने स्वीकार केलेला दिसतो. उदाहरणार्थ, केरळमध्ये ओणम हा सण साजरा करताना हिंदू असोत वा ख्रिस्ती दोन्ही धर्मीय लोक दिवा मधोमध ठेवून भोवतीने फुलांच्या मोठाल्या रांगोळ्या काढतात. तसे करताना आपण हिंदू रीतीरिवाजाचे पालन करतो आहोत असा विचारही कुणाच्या मनाला शिवत नाही. आपण केरळी अथवा मल्याळी रिवाजाचे पालन करतो आहोत अशीच भावना त्यामागे असते. बाळाला काळी तीट लावण्याचा रिवाज तमाम भारतीय पाळतात. बाळाला दृष्ट लागू नये म्हणून त्याला काळी तीट लावणे हा हिंदु धर्मीय रिवाज आहे असे कुणी म्हणेल का? विशेषत: दक्षिण भारतात सर्व धर्मीय लहान बाळांच्या कपाळाच्या कोपर्यात वा कानाच्या मागे अशी तीट आढळून येते. या गोष्टी हिंदू धर्मापेक्षाही भारतीय संस्कृतीचा भाग आहेत. भारतीय संस्कृतीतून हिंदू संस्कृती रेघ काढून वेगळी करता येणार नाही. याचे कारण, हिंदू धर्म हा अन्य काही धर्मांप्रमाणे संस्थात्मक धर्म नसून ती जगण्याची एक पद्धती आहे असे सोशिऑलॉजीसारख्या समाजशास्त्रातही सांगितले जाते. त्यामुळेच राजनाथ सिंह यांनी जे केले त्याबद्दल अकारण वाद निर्माण करण्यापेक्षा तो भारतीय संस्कृतीचा एक भाग कसा आहे हे समजून घेण्याची गरज आहे.