अमरावती ः पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांतील मोठे, मध्यम व लघु अशा एकूण 502 प्रकल्पांत सरासरी 24.90 टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली आहे. यामध्ये बुलडाणा व अमरावती जिल्ह्यातील सरासरी पाणीसाठ्याची स्थिती बिकट आहे. परिणामी पुढील पावसाळ्यापर्यंत तीन महिने पाण्याचे नियोजन योग्यरीत्या जलसंपदा विभागासह संबंधित यंत्रणेला करावे लागणार आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सर्वाधिक कमी 7 टक्केच पाणीसाठा आहे. त्यामुळे या जिल्ह्यात सिंचनाला देण्यात येणारे पाणी यापूर्वीच थांबविण्यात आले आहे. यंदा पाणीटंचाईची झळ नागरिकांना आतापासूनच जाणवू लागली आहे. विभागातील आठ मोठ्या प्रकल्पांत फक्त 25.45 टक्के, 24 मध्यम प्रकल्पांत 33.42 टक्के, 469 लघु प्रकल्पांत फक्त 18.89 टक्के अशा एकूण 502 प्रकल्पांत सरासरी 24.90 टक्के पाणीसाठा आहे. या प्रकल्पांचा प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा 3296.16 दलघमी आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा 820.63 दलघमी आहे. अमरावती जिल्ह्यातील एकूण 85 प्रकल्पांत 26.38 टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 120 प्रकल्पांत सर्वाधिक 34.23 टक्के पाणीसाठा, अकोला जिल्ह्यातील 46 प्रकल्पांत 26.38 टक्के पाणीसाठा, वाशिम जिल्ह्यातील 146 प्रकल्पांत 20.26 टक्के पाणीसाठा, बुलडाणा जिल्ह्यातील 105 प्रकल्पांत सर्वात कमी 7.23 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. विभागातील आठ मोठ्या प्रकल्पांत 25.45 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये अमरावती शहराला पाणीपुरवठा करणार्या उर्ध्व वर्धा धरणात 22.99 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्पात 46.63 टक्के पाणीसाठा, अरुणावती प्रकल्पात 29.38 टक्के, बेंबळा प्रकल्पात 27.54 टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात 31.16 टक्के, वान प्रकल्पात 53.62 टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात 11.31 टक्के, पेनटाकळी प्रकल्पात सर्वात कमी 2.95 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. परिणामी बुलडाणा जिल्ह्यांतील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासंदर्भात चिंता वाढली आहे.