Breaking News

अग्निशमन दलाची धाडसी कामगिरी

पुणे ः पुण्यामध्ये शनिवारी (2 मार्च) अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला चेतन ओसवाल (39) हे विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने एका इमारतीत लिफ्टमध्ये अडकल्याची माहिती मिळाली. चेतन हे तासभरापासून लिफ्टमध्ये अडकले असून ते खूप घाबरलेल्या अवस्थेत आहेत. त्यांना लवकर वाचवा, असा फोन चेतन यांच्या वडिलांनी केला होता. भवानी पेठेतील भवानी माता मंदिरासमोर तिरुपती सहकारी संस्था या इमारतीत ही घटना घडली.

घटनेचा माहिती मिळताच नियंत्रण कक्षाकडून तातडीने मदत पाठवली गेली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तिथे जाऊन पाहिले. पहिल्या व दुसर्‍या मजल्याच्या मधोमध लिफ्ट अडकली असून चेतन आणि त्यांचे वडील खूपच घाबरले होते. जवानांनी आता आम्ही आलो आहोत. तुम्ही घाबरू नका. पाच मिनिटांत तुम्ही सुखरुप बाहेर याल, असे सांगितले. नंतर लिफ्ट रुममध्ये जाऊन जवानांनी तिथे असलेल्या एक चकती टॉमी बारच्या साहाय्याने फिरवून लिफ्ट पहिल्या मजल्यावर घेतली व चेतन यांची पाचच मिनिटांत सुखरूप सुटका केली.चेतन यांच्या वडिलांना आपला मुलगा सुखरूप बाहेर आला हे पाहून अश्रू अनावर झाले. त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांसमोर हात जोडत अश्रू पुसले. तसेच तुम्ही देवासारखे पाच मिनिटांत धावून आलात, असे म्हणत त्यांचे आभार मानले. या कामगिरीत दलाचे प्रभारी अधिकारी सचिन मांडवकर, वाहनचालक राजू शेलार, तांडेल राजाराम केदारी, जवान मंगेश मिळवणे, रऊफ शेख, योगेश चोरघे, प्रताप फणसे, अक्षय शिंदे, विठ्ठल शिंदे, रोहित रणपिसे यांचा सहभाग होता.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply