मुंबई ः प्रतिनिधी
काही काळ विश्रांती घेतल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होत असल्याचे बघायला मिळत आहे. हवामान खात्याने अलर्ट दिल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी मंगळवारी (दि. 31) पावसाला जोरदार सुरुवात झाली. राज्यात 22 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी झाला होता. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली होती. ऑगस्ट महिन्यात श्रावण सरी सर्वत्र होत नसल्याने बळीराजावर संकट ओढवले होते. मराठवाड्याला याचा सर्वाधिक फटका बसला होता. त्यातच राज्यातील अनेक धरणांच्या पाणी पातळीत अपेक्षित अशी वाढ होत नसल्याचे चित्र होते, पण आता छत्तीसगडवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने तसेच पूर्व-पश्चिमेकडून दोन्ही दिशेने वारे वाहत असल्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन पाऊस पडत आहे. पुढील तीन-चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे, तर पुढील दोन दिवस उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने रायगड जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट दिला होता. हा अंदाज खरा ठरवत पावसाने जोरदार पुनरागमन केले. संपूर्ण जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसत होत्या.
चाळीसगावमध्ये ढगफुटी; पुरात काही लोकांचा मृत्यू; शेकडो जनावरे वाहून गेली
चाळीसगाव ः जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस पडला असून अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. मुसळधार पावसामुळे या तालुक्यात पूर येऊन काही जणांचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे 800 जनावरे वाहून गेली आहेत. चाळीसगाव तालुक्यात पावसाने थैमान घातल्याने गिरणा, तितूर आणि डोंगरी या तिन्ही नद्यांना पूर आला. त्यामुळे चाळीसगाव शहरासह आजूबाजूच्या 15 गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला. वाकडी गावातील वृद्धा कलाबाई पांचाळ (वय 63) या वाहून जावून त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. पिंपरखेड या गावी पुराच्या पाण्यात एका अनोळखी इसमाचा मृतदेह वाहून आला असून त्याची ओळख पटलेली नाही. याशिवाय आणखी काही लोकांचा मृत्यू झाल्याचे समजते. अनेक गावांमध्ये पुरामुळे शेकडो गुरेही वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कन्नड घाटात दरड कोसळली
औरंगाबाद ः मुसळधार पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड घाटात तीन ठिकाणी दरड कोसळली आहे. त्यामुळे औरंगाबाद-धुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. परिणामी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. दरड कोसळून एक गाडी घाटातून खाली कोसळली असल्याची माहिती मिळाली आहे, तर अनेक गाड्या चिखलात अडकल्या आहेत. या अपघातातून वाचलेल्या लोकांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना आपला चित्तथरारक अनुभव सांगितला. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर दगड व मातीचे ढीग पडलेले आहेत. ते दूर करण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने प्रयत्न सुरू आहेत. ही दरड आणि राडा-रोडा जोवर दूर केला जात नाही, तोपर्यंत घाटातील वाहतूक सुरळीत होणे अशक्य आहे. दरम्यान, कन्नड घाटात तीन ठिकाणी दरड कोसळल्यामुळे औरंगाबाद-धुळे महामार्ग वाहतूकीसाठी बंद आहे. तरी नागरिकांनी प्रवासासाठी या रस्त्याचा वापर करू नये, औरंगाबादला जाण्यासाठी नांदगाव मार्गाचा वापर करावा तसेच औरंगाबादहून येण्यासाठी जळगाव मार्गाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.