Breaking News

बारामतीत यंदा इतिहास घडणार; चंद्रकात पाटलांचे भाकीत

वडगाव बुद्रुक ः प्रतिनिधी

 बारामती मतदारसंघातील निवडणूक सुप्रिया सुळे विरुद्ध कांचन कुल यांच्यामध्ये नसून देश तोडणारे आणि देश जोडणारे यांच्यातील आहे. या वेळी बारामतीत इतिहास घडणार आहे, असे भाकीत महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी या वेळी वर्तविले. महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ रविवारी वडगाव बुद्रुक येथे ’मैं भी चौकीदार’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पाटील बोलत होते. या वेळी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी खासदार प्रदीप रावत, आमदार भीमराव तापकीर, आमदार राहुल कुल, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, खडकवासला मतदारसंघातील महायुतीचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. महसूलमंत्री चंद्रकात पाटील म्हणाले की, इंदापूर आणि भोर येथून या वेळी मोठ्या प्रमाणात मतदान होणार आहे. तेथील लोकांच्या भावना जाणून घेतल्या असता ते भाजप सरकारच्या पाच वर्षांच्या कामगिरीने पूर्णपणे समाधानी आहेत. त्यांनी पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांच्या नावालाच पसंती दर्शविली आहे. केंद्रात आणि राज्यात भाजप सरकारच्या माध्यमातून असंख्य विकासकामे करण्यात आली आहेत.

तेथील ज्येष्ठ नेते महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रामाणिकपणे काम करीत आहेत. या वेळी येथे इतिहास घडणार आहे आणि मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली कांचन कुल निवडून येतील यात तिळमात्र शंका नाही, असा विश्वास राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केला. या निवडणुकीत स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गल्लीतील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. यावरून मुलीच्या पराभवाचा धसका शरद पवार यांनी घेतल्याचे दिसत आहे. यंदा राष्ट्रवादी काँग्रेसची भ्रष्टाचाराची कीड कायमची नष्ट करण्याची संधी मतदारांकडे चालून आली आहे आणि मतदार ती कीड संपविल्याशिवाय गप्प राहणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. या वेळी मेळाव्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या विजयाची गुढी उभारण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply