रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची आघाडी आहे. भाजप-शिवसेना यांच्या विरोधात मतविभागणी होऊ नये म्हणून ही आघाडी करण्यात आली आहे. काँग्रेसला महाडची जागा सोडण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला श्रीवर्धन व कर्जत हे दोन मतदारसंघ आले आहेत. शेकाप अलिबाग, पेण, पनवेल व उरण या चार जागा लढवत आहे. असे असले तरी अलिबाग व पेण येथे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या दोन्ही मतदारसंघांत शेकाप आणि काँग्रेस यांची मैत्रीपूर्ण लढत आहे. काँग्रेसची मते अलिबागमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला व पेणमध्ये भाजपच्या उमेदवारांना मिळू नयेत यासाठी शेकापने ही मैत्रीपूर्ण लढतीची खेळी खेळली आहे, परंतु ही चाल अलिबाग विधानसभा मतदारसंघात शेकापला भोवण्याची शक्यता जास्त आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी रायगड जिल्ह्यात सातही जागा शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्रित लढवाव्यात, असा निर्णय घेण्यात आला होता, मात्र उत्तर रायगडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांचा
शेकापसोबत आघाडीला विरोध होता. शेतकरी कामगार पक्ष हा काँग्रेसचा पारंपरिक विरोधी पक्ष असल्याने कार्यकर्ते ही आघाडी स्वीकारणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. अशा वेळी पक्षाचा उमेदवार नसेल तर शेकाप आणि काँग्रेसची पारंपरिक मते युतीकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे आघाडीबाबत सोयीस्कर धोरण स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अलिबाग, पेण, उरण येथे शेकापचे उमेदवार असताना तेथे मैत्रीपूर्ण लढती करण्याचे ठरविण्यात आले. उरणमध्ये डॉ. मनीष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती, परंतु त्यांच्या उमेदवारीमुळे शेकापच्या उमेदवाराचे नुकसान होऊ शकेल हे लक्षात आल्यानंतर त्यांना निवडणूक अर्ज भरण्यापासून थांबविण्यात आले. पेणमध्ये नंदा म्हात्रे तर अलिबागमध्ये अॅड. श्रध्दा ठाकूर यांना काँग्रेसतर्फे उमेदवारी देण्यात आली. अलिबाग मतदारसंघात काँग्रेसने अॅड. श्रध्दा ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे.
अलिबाग विधानसभा मतदारसंघात पूर्वी शेकाप विरुद्ध काँग्रेस अशीच लढाई व्हायची. शिवसेनेने या मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले होते, परंतु ते 25 हजार मतांच्या पुढे जाऊ शकले नाहीत. तेव्हा अलिबाग- उरण असा मतदारसंघ होता. 2009मध्ये मतदारसंघांची पनर्रचना करण्यात आली. त्यात अलिबाग विधानसभा मतदारसंघातून उरण वेगळा झला. अलिबाग, मुरूड हे दोन पूर्ण तालुके तसेच रोहा तालुक्यातील चणेरे हा जिल्हा परिषदेचा मतदारसंघ असा मिळून अलिबाग-मुरूड हा मतदारसंघ तयार करण्यात आला. 2009मध्ये शेकाप- शिवसेना अशी युती होती. त्यात काँगे्रसचे मधुकर ठाकूर यांचा शेकापच्या मीनाक्षी पाटील यांनी 23 हजार मतांनी पराभव केला होता. 2014मध्ये शेकाप व शिवसेना यांची युती फिस्कटली. सर्वच पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवल्या. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले महेंद्र दळवी यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. काँग्रेसचे मधुकर ठाकूर, शेकापचे पंडित पाटील, भाजपचे प्रकाश काठे, तर राष्ट्रवादीचे अॅड. महेश मोहिते असे प्रमुख उमेदवार होते. या निवडणुकीत शेकापचे पंडित पाटील व काँग्रेसचे मधुकर ठाकूर यांच्यात लढत होईल असे वाटले होते. तसे न होता पंडित पाटील व महेंद्र दळवी यांच्यात लढत झाली. पंडित पाटील विजयी झाले. मधुकर ठाकूर तिसर्या क्रमांकावर फेकले गेले. महेंद्र दळवी यांना दुसर्या क्रमांकाची मते मिळाली. तेव्हापासून या मतदारसंघात शिवसेना एक ताकद म्हण्ाून समोर आली. या मतदारसंघातील राजकीय चित्र बदलत गेले.
शिवसेना भक्कमपणे वाढू लागली. रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष तथा सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी विशेष लक्ष दिल्यामुळे या मतदारसंघात भाजपची ताकद वाढली. काँग्रेस तसेच शेकापच्या काही नेत्यांनी शिवसेना व भाजपत प्रवेश केला. 2009प्रमाणे भाजप-शिवसेना यांची युती होणार नाही. भाजप 2014मध्येदेखील अलिबाग विधानसभा मतदारसंघात आपला उमेदवार उभा करेल असे शेकापला वाटत होते, परंतु तसे झाले नाही. भाजप- शिवसेना यांची युती झाली. त्यामुळे या दोन पक्षांची मतविभागणी टळणार आहे. काँग्रेसची मते शिवसेनेकडे जाऊ नयेत यासाठी शेकापने मैत्रीपूर्ण लढत होण्यास हरकत घेतली नाही. काँग्रेेसने अॅड. श्रध्दा ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. राजेंद्र ठाकूर यांनी बंडखोरी केली आहे. काँग्रेससोबत मैत्रीपूर्ण लढत शेकापला का हवी होती हे आता लपून राहिले नाही. मतदारांना हे समजले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप अशी आघाडी झाली होती. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले होते. आतादेखील तीच परिस्थिती आहे. या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार विजयी होणार नाही हे माहीत असताना उमेदवारीसाठी एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींमध्ये चुरस होती. त्यात राजेंद्र ठाकूर यांनी बंडखोरी केली आहे. सध्या अलिबाग तालुक्यातील काँग्रेसचे दुसर्या फळीतील नेते राजेंद्र ठाकूर यांच्यासोबत असले तरी कट्टर काँग्रेसी मात्र अॅड. श्रध्दा ठाकूर यांच्यासोबत आहेत. काँगे्रसमधील भांडणामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. यातून चुकीचा संदेश मतदारांमध्ये जात आहे. 2014 साली मधुकर ठाकूर यांना 44 हजार मते मिळाली होती, ती मधुकर ठाकूर हे उमेदवार होते म्हणून. या वेळी ते स्वतः उमेदवार नाहीत. जी मते मधुकर ठाकूर यांना मिळाली होती, ती सर्व मते अॅड. श्रध्दा ठाकूर व राजेंद्र ठाकूर यांना मिळणार नाहीत. शेकाप नको म्हणून 2014 साली मधुकर ठाकूर यांना मिळालेली काठावरील मते या वेळी शिवसेनेचे महेंद्र दळवी यांच्याकडेच वळणार आहेत. जर स्वतः मधुकर ठाकूर उमेदवार असते तर कदाचित चित्र वेगळे असते. मधुकर ठाकूर उमेदवार नाहीत त्यामुळे काँग्रेसची मते स्थिर ठेवण्यासाठी केलेली मैत्रीपूर्ण लढतीची चाल यशस्वी होणार नाही. मैत्रीपूर्ण लढतीचा फटका शेकापच्या उमेदवारालाच बसण्याची शक्यता जास्त आहे.
-प्रकाश सोनवडेकर