अलिबाग : प्रतिनिधी
आदिवासींच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या रायगड शाखेतर्फे बुधवारी (दि. 23) अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या रायगड शाखेचे अध्यक्ष लक्ष्मण निरगुडा, भारत मुक्ती मोर्चाचे रायगड जिल्हा अध्यक्ष विजय आवास्कर, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष समीर घासे, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे नितीन गायकवाड, राष्ट्रीय आदिवासी छात्र संघाचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष सीताराम लेंडी, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे वाल्मिकी बागूल, तुषार कडू, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे पेण तालुका अध्यक्ष कृष्णा खाकर आदी या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. विकासाच्या नावाखाली आदिवासींच्या जमिनी बळकावल्या जात आहेत. आदिवासींची एक संस्कृती आहे. त्यांची वेगळी ओळख आहे. त्यांची ही ओळख पुसली जात आहे. जल, जंगल, जमिनीपासून त्यांना बेदखल केले जात आहे, हे थांबवावे. तसेच आदिवासींचे जबरदस्तीने होणारे धर्मांतर थांबवावे, आदिवासीपाड्यांवर मूलभूत सुविधा देण्यात याव्यात, रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या आदिवासींना रोजगार द्यावा, अनुसूचित जमातींच्या रिक्त जागा भराव्यात आदी मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले.