Breaking News

मतदान जनजागृतीसाठी ‘भावी मतदारां’चा मेळावा

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त

राज्यात 21 ऑक्टोबर रोजी होणार्‍या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा याकरिता मतदार शिक्षण व निवडणूक सहभाग अर्थात स्वीप हा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. या अनुषंगाने मतदारांपर्यंत मतदान करण्याचा संदेश पोहचविला जात आहे. या अनुषंगाने विद्यार्थी मतदारांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत असून नेरूळ सेक्टर 5 येथील एसआयईएस महाविद्यालयात विद्यार्थी मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सुप्रसिद्ध सिनेनाट्य अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना लोकशाहीतील मतदानाचे महत्त्व पटवून दिले. मतदान हा आपला हक्क असून त्याद्वारे आपण भारतीय लोकशाही बळकट करतो, असे सांगत त्यांनी योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. पहिल्यांदाच मतदान करणारे महाविद्यालयीन युवक-युवतींनी उत्साहाने मतदान करून आपला हक्क बजावलाच पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

सध्याच्या लोकप्रिय कलावंताने केलेल्या आवाहनाला विद्यर्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वेळी महाविद्यालयातील एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी मतदानाविषयी जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. या वेळी अभिनेते पुष्कर श्रोत्री यांच्यासह स्वीप मोहिमेच्या प्रमुख रेवती गायकर, 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, स्वीपचे नोडल अधिकारी महापालिका उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत तायडे आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या वेळी पालिका माध्यमिक शाळा क्र. 101 शिरवणेचे विद्यर्थी उपस्थित होते.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply