Breaking News

डॉ. आनंदीबाई जोशी

डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर. त्यांचा संघर्ष, जिद्द, कष्ट व त्या काळातील सामाजिक अपप्रवृत्तींचा विळखा या सगळ्यांना तोंड देत 18व्या शतकात वयाच्या 19व्या वर्षी अमेरिकेस जाऊन डॉक्टर होऊन भारतात आल्या. वयाच्या 14व्या वर्षी माता झालेल्या आनंदीबाई यांचं स्वतःच मूल योग्य उपचाराविना अवघ्या 10 दिवसांचे असताना जेव्हा वारले, तेव्हा त्यांनी जिद्द ठेवली की खूप शिकून डॉक्टर व्हायचे व इतर मुलींचे आयुष्य घडवायचे. ही हकिगत आपल्या पतीच्या कानावर घातली असता गोपाळराव जोशी यांनीही साथ दिली. ही बाब अक्षरशः वाखाणण्याजोगी होती. आनंदीबाई यांचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते.

ठाण्यातील जुन्या कल्याण पारनाका येथील गणपत अमृतेश्वर जोशी यांच्या यमुना या ज्येष्ठ कन्या. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह 20 वर्षांहून मोठे असणार्‍याा गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. लग्नानंतर गोपाळरावांनी आपल्या पत्नीचे नाव यमुना बदलून आनंदीबाई असे ठेवले. वयाच्या 14व्या वर्षी आनंदीबाईंनी मुलाला जन्म दिला. वैद्यकीय उपचार न मिळाल्याने ते मूल फक्त 10 दिवस जगले व आनंदीबाईंच्या जीवनात हा एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला. यातून आनंदीबाईंना डॉक्टर बनण्याची प्रेरणा मिळाली. गोपाळराव कल्याणला पोस्ट ऑफिसात कारकून होते. नंतर अलिबाग व त्यानंतर कोलकाता येथे बदली झाली. गोपाळरावांचा त्या काळात महिला शिक्षणाला पाठिंबा होता. तो काळ म्हणजे पारतंत्र्याबरोबरच महिलांना तोंड लपवून पदराआड, तर पायात चप्पल न घालता अनवाणी जाण्याचा होता. याच काळात आपल्या पत्नीने वैद्यकीय शिक्षण घ्यावे म्हणून गोपाळरावांचा पूर्ण व्होरा होता. त्याकाळी  भारतीय समाजाकडून आनंदीबाईंच्या डॉक्टर होण्याला खूप विरोध झाला.

आनंदीबाईंनी कोलकाता येथे केलेल्या भाषणात भारतामध्ये महिला डॉक्टरांची किती आवश्यकता आहे हे पटवून दिले आणि स्पष्ट केले की, मला यासाठी धर्मांतर वगैरेे करण्याची काही गरज नसून माझा धर्म व संस्कृती याचा त्याग करणार नाही, तसेच

देशाभिमानही सोडणार नाही. वैद्यकीय शिक्षण झाल्यावर माझ्या देशात महिलांसाठी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा मानस होता. त्यांच्या वैद्यकीय शिक्षणास विरोध करणार्‍यांनीच नंतर आर्थिक मदत केली, तर  तत्कालीन ब्रिटिश अधिकार्‍यांनीही मोठी देणगी दिली होती. मोठ्या जिद्दीने आनंदीबाईंनी मार्च 1886मध्ये एमडीची पदवी मिळवून प्रसूतिशास्त्र प्रबंध सादर केला. भारतातील पहिली स्त्री डॉक्टर झालेल्या त्या पदवीदान सोहळ्यास खुद्द पंडिता रमाबाई हजर होत्या. पती गोपाळरावही जातीने हजर होते. भारतात आल्यावर कोल्हापुरातील अल्बर्टट एडवर्ड रुग्णालयातील स्त्री कक्षाचा त्यांना ताबा  देण्यात आला. दुर्दैव असे की भारतातील पहिली महिला डॉक्टर वयाच्या विशीतच

क्षयरोगाच्या हवाली जात 26 फेब्रुवारी 1887 रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले. केवळ 21 वर्षांच्या जीवनयात्रेत आनंदीबाईंनी भारतीय महिलांसाठी प्रेरणादायी आदर्श जीवन उभे केले. चूल आणि मूल एवढीच परिसीमा असणार्‍या काळात एका महिला वैद्यकीय अधिकार्‍याने महिलांना त्या काळात आदर्श व मानदंड घालून दिला. परदेशातही 21 वर्षे वयाच्या या महिला डॉक्टर आनंदीबाई यांचे अमेरिकेत लहानसे थडगे बांधले आहे. त्यावर आनंदी जोशी, एक तरुण हिंदू ब्राह्मणकन्या, परदेशात शिक्षण घेऊन डॉक्टर पदवी मिळवणारी पहिली भारतीय स्त्री, अशी अक्षरे कोरून त्यांचे स्मारक उभे केले आहे.

-अरूण नलावडे, फिरस्ती

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply