Breaking News

कोरोना संकटात नैसर्गिक आपत्ती

महाराष्ट्रासह संपूर्ण देश सध्या वैश्विक महामारी कोरोनाचा सामना करीत असताना चक्रीवादळरूपी नैसर्गिक आपत्तीने अरबी समुद्र किनारपट्टीवरील नागरिकांच्या त्रासात अधिकच भर घातली आहे. केरळपासून घोंघावलेल्या आणि गुजरातपर्यंत धडकलेल्या या वादळाने जीवित आणि वित्तहानी घडवून आणली. त्यामुळे लोक हवालदिल झाले आहेत.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने देशात थैमान घातले आहे. कोरोनाबाधित होणार्‍यांचा आकडा सध्या कमी होऊन काही प्रमाणात दिलासा मिळत असला तरी मृतांची आकडेवारी काही कमी होण्याचे नाव घेत नाहीए. दररोज सरासरी चार हजारांहून अधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू होतोय. या जागतिक संकटाने सर्वांच्याच नाकीनऊ आणले असून, जगणे मुश्कील झाल्याचे चित्र आहे. हे कमी म्हणून की काय आता निसर्गानेही तडाखा दिला. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन त्याचे चक्रीवादळात रूपांतर झाले. या चक्रीवादळाची हवामान खात्याने पूर्वकल्पना दिली होती. त्या पार्श्वभूमीवर काळजीही घेण्यात आली होती, मात्र वादळ रोखणे कुणाच्याच हाती नव्हते. हे वादळ अखेर घोंघावलेच. केरळपासून कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र असे वर सरकत ते गुजरातकडे झेपावले. यादरम्यान त्याने प्रचंड हानी केली. या वादळात अनेकांचा मृत्यू झाला असून, काही जण जखमी झाले आहेत. सार्वजनिक व खासगी मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय शेती, फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. गतवर्षी निसर्ग वादळाचा कोकण किनारपट्टीला फटका बसला होता. त्या तुलनेत आताच्या वादळाची तीव्रता कमी होती, परंतु याही वादळी पावसात मनुष्य व अन्य जीवांचा बळी जाणे, घरांची पडझड होणे, वृक्ष उन्मळून पडणे, विजेचे खांब व तारा कोसळणे, वीजपुरवठा खंडित होणे असे प्रकार घडले. त्यामुळे परिस्थिती सुरळीत करण्याचे आव्हान आता राज्य शासन आणि प्रशासनासमोर आहे. याबाबतीत गेल्या वेळचा अनुभव चांगला नाही. मागील वर्षी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र त्या वेळी तत्काळ मदत सोडाच पण साधा ठिकठिकाणी पडलेला कचरा तातडीने उचलण्याचे सौजन्यही राज्यकर्त्यांनी दाखविले नाही. अनेक भागांत तर बरेच दिवस बत्ती गूल होऊन नागरिक त्रस्त झाले होते. शासनाकडून अर्थसहाय्य उशिराने मिळाले, तेही तुटपुंजेच. राज्यातील लोक आधीच कोरोना महामारीने बेजार झालेले आहेत. महाराष्ट्र कोरोना रुग्णसंख्येत आणि मृतांच्या आकडेवारीत अव्वल असून, आरोग्य सुविधा व्यवस्थितपणे मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचे चित्र आहे. अशातच नैसर्गिक आपदेने पुढे काय व कसे करायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील जनतेने शासन-प्रशासनाला संयम राखून खूप सहकार्य केलेले आहे. आता शासन-प्रशासनाने जनतेला साथ देणे जरुरीचे आहे. राज्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाने दाणादाण उडवली. पालघर आणि मुंबईतही वादळाचा प्रभाव जाणवला, तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवड्यात त्याचा थेट परिणाम झाला नसला तरी जलधारा जोरदार बरसल्या. त्यामुळे जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात वादळामुळे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे चालू हंगामातील ऐन काढणीला आलेले पीक यामुळे वाया गेले आहे. ते पाहता राज्य शासनाने वादळग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत करून त्यांना पुन्हे उभे करण्यासाठी प्राधान्य देणे आवश्यक आहे.

Check Also

संगीतकार राजेश रोशन 50 वर्षांचे करियर : एक रास्ता है जिंदगी…

यश चोप्रा निर्मित व रमेश तलवार दिग्दर्शित दुसरा आदमी (1977) या चित्रपटातील चल कहीं दूर …

Leave a Reply