पालघर : प्रतिनिधी
गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील सागरी सीमेवर मासेमारी करणार्या भारतीय नौकेवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात पालघर जिल्ह्यातील एका माच्छीमाराचा मृत्यू झाला आहे, तर गुजरातमधील एका मच्छीमाराला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे मच्छीमारांमध्ये चिंतेचे व संतापाचे वातावरण आहे. गुजरात राज्याच्या ओखा बंदरातील ‘जलपरी’ ही नौका शनिवारी मासेमारी करण्यास समुद्रात गेली होती. ही मासेमारी नौका गुजरात राज्यातील ओखा इथे मासेमारी करत असताना पाकिस्तानी सागरी सुरक्षा रक्षकांनी पहाटेच्या सुमारास भारतीय हद्दीत शिरकाव करून मासेमारी नौकेवर बेछूट गोळीबार केला. त्यात पालघर जिल्ह्यातील वडराई गावातील तरुण मच्छीमार श्रीधर रमेश चामरे (वय 30) यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मच्छीमारांमध्ये संताप आहे. महाराष्ट्र व गुजरात सरकारने तातडीने पावले उचलून केंद्र सरकारच्या मदतीने श्रीधर रमेश चामरे यांचा मृतदेह सन्मानपूर्वक आणावा व पाकिस्तानी सैनिकांच्या अमानवी कृत्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर चौकशी केली जावी, अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे. याप्रकरणी ओखा येथील मरीन पोलीस स्थानकांमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून या घटनेची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती नौकेचे मालक जयंताभाई बोखामा यांनी दिली.