Breaking News

चतुरस्त्र अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी

मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्यक्षेत्रातील विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर झाला. 5 नोव्हेंबर रोजी कवी, लेखक व नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

मराठी, हिंदी चित्रपट-नाट्यक्षेत्रातील एक सशक्त अभिनेत्री म्हणून रोहिणी जयदेव हट्टंगडी यांची ओळख आहे. माहेरच्या त्या रोहिणी अनंत ओक. रोहिणीताई रंगभूमीवरील व चित्रपटांतील ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. रिचर्ड अँटनबरो निर्मित ‘गांधी’ चित्रपटातील कस्तुरबाच्या भूमिकेमुळे त्या आंतरराष्ट्रीय चित्रपट जगतात पोहचल्या.

रोहिणी हट्टंगडी यांचा जन्म 11 एप्रिल 1955 रोजी दिल्ली येथे झाला. वडिलांचे नाव अनंत मोरेश्वर ओक, तर आईचे नाव निर्मला. त्यांच्या अभिनयाची सुरुवात पुण्याच्या भावे स्कूलपासून झाली. तिथे झालेल्या नाटकांत, अनेक नाट्यस्पर्धांत आणि औद्योगिक आस्थापने आयोजित करीत असलेल्या नाट्यप्रयोगांत त्या भाग घेत राहिल्या. त्यांचे वडील, आई आणि बंधू (रवींद्र ओक) हे तिघेही नट होते. त्या सगळ्यांनीच ‘गावगुंड’ या मराठी नाटकात भूमिका केली होती.

रोहिणी ओक 1970मध्ये बीएस्सी झाल्या आणि 1971मध्ये त्यांची निवड दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) या संस्थेत अभिनयाच्या प्रशिक्षणासाठी झाली. तीन वर्षांच्या या काळात रोहिणी ओकांनी विविध भाषांमधील नाटकांतून कामे केली. प्रेमचंदांच्या ‘गोदान’वर आधारित ‘होरी’ नाटकातील ‘धनिया’ची भूमिका, ‘इबारगी’ या जपानी ‘काबुकी’ पद्धतीच्या नाटकातील मावशीची भूमिका, कर्नाटकातील यक्षगान शैलीतील ‘भीष्मविजय’मधील ‘अंबे’ची भूमिका, ‘अंधा युग’मधील ‘गांधारी’ची भूमिका अशा विविध भूमिका त्यांनी केल्या. या प्रशिक्षणाचाच भाग म्हणून ‘एका म्हातार्‍याचा खून’ या नाटकाचे दिग्दर्शनही त्यांनी केले. ‘एनएसडी’चा अभ्यासक्रम पूर्ण करून त्या पुणे येथे आल्या.

रोहिणी ओक 28 मे 1977 रोजी जयदेव हट्टंगडी यांच्याशी विवाहबद्ध होऊन रोहिणी हट्टंगडी झाल्या. जयदेव हट्टंगडी हे दिल्लीच्या ‘एनएसडी’मध्ये दिग्दर्शनाचे प्रशिक्षण घेत होते. रोहिणी हट्टंगडी यांनी अनेक नाटकांतून आणि चित्रपटांतून भूमिका केल्या. त्यांच्या चित्रपटांत सहा तेलुगू चित्रपट आहेत. त्याशिवाय हिंदी-मराठी दूरदर्शन मालिकांतूनही त्या दिसतात. हट्टंगडी दाम्पत्याने ‘कलाश्रय’ ही नाट्याभ्यास करणारी व प्रयोगशीलतेला प्रोत्साहन देणारी संस्था स्थापन केली आहे. त्या संस्थेतर्फे त्यांनी ‘वाडा भवानी आईचा’, ‘अपराजिता’ (एकपात्री प्रयोग) अशा नाटकांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण भूमिका केल्या आहेत. रोहिणी हट्टंगडी या मुंबईहून प्रसिद्ध होणार्‍या ‘चारचौघी’ या मान्यताप्राप्त ललित मासिकाच्या संपादिका आहेत. रोहिणी अनंत ओक म्हणजे लग्नानंतर रोहिणी जयदेव हट्टंगडी या ज्येष्ठ अभिनेत्री आहे. त्यांच्या परिचयाची गरज नाही. सर्वच जण त्यांना टीव्हीमुळे ओळखतात. रंगभूमी आणि चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाची प्रतिभा दाखवणार्‍या रोहिणी यांचा जन्म दिल्लीत झाला असला तरी अभिनयाची सुरुवात मात्र पुण्याच्या भावे स्कूलपासून झाली.

कुटुंबातूनच त्यांच्यात अभिनयाची आवड आली. त्यांच्या कामाची यादी भलीमोठी आहे. अनेक नाटके व चित्रपटांत त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण भूमिका करून अनेक पुरस्कार मिळवले आहेत. आजही हिंदी-मराठी चित्रपट व मालिकांत त्या दमदार भूमिका निभावून प्रेक्षकांची मने जिंकतात. विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

-योगेश बांडागळे, सिनेप्रहर

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply