महाराष्ट्राच्या 14व्या विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान होत असून, आता केवळ बोटावर मोजण्याइतकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. प्रचारसभांचा धूमधडाका जोरात सुरू असून, तो शिगेला पोहचला आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराची सूत्रे हाती घेतली असून, संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. त्यांचे मोठे (राजकीय) बंधू उद्धव ठाकरे यांनीही जोरदार रणशिंग फुंकले असून, जबरदस्त दांडपट्टा चालविला आहे. बोलघेवड्या नेत्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर आधीच बसवून ठेवलेले युवराज आदित्य उद्धव ठाकरे यांनी आपले पाय जमिनीवर असल्याचे आपल्याच बोलघेवड्या नेत्यांना दाखवून देत मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. मला कोणत्याही पदाची लालसा नाही, हे निक्षून सांगितले आहे.
देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्या बरोबरीने आदित्य ठाकरेही सभा गाजवताहेत. चंद्रकांतदादा पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे ’घड्याळ’ बहुतेक तोडून मोडून टाकतील की काय, असाच प्रश्न जणू राज्यातल्या जनतेला पडलाय. कोल्हापूरहून कोथरूड येथे येतानाच दादांनी पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या मंडळींना पांढरा रस्सा, तांबडा रस्सा शाब्दिक चवीनं चाखायला लावल्याचं दिसतंय. कारण शरद पवार आणि अजित पवार यांना हा रस्सा पक्का झणझणीत लागलाय की काय असं वाटाया लागलंय. शरदचंद्र पवार हे आज वयाच्या ऐंशीच्या घरात असूनही त्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह तरुणांना लाजवेल असाच लाजवाब आहे. त्यांच्या समोर बाकीचे तरुण जाऊ द्या, पार्थ आणि रोहित हे त्यांचे नातूसुद्धा फिके पडतील असं दिसाया लागलंय. म्हणूनच कदाचित शरद पवार यांनी पार्थ आणि रोहित यांना विरोध केला असावा. बरोबर आहे सुप्रिया आणि पार्थ-रोहितमध्ये फरक आहेच की. अर्थात याबद्दल आपण बाहेरच्यांनी नाक खुपसायची गरज नाही. हा निव्वळ फॅ मिली मॅटरचा मामला हाय. मंदी काय झालं बघितलं न्हवं नां?
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणात दादांना चक्क रडू कोसळलं. आमदारकीचा राजीनामा देऊन दादा सरळ अज्ञातवासात निघून गेले. आपल्यामुळे सायबाला या वयात त्रास सहन करावा लागतोय, ही कल्पनाच दादांना सहन करण्यापलीकडची होती. म्हणून दादांच्या डोळ्यातनं घळाघळा आसवं पडाया लागली. एक लक्षात आलं का? मुंबई मराठी पत्रकार संघात त्याच वेळेस कॉम्रेड माणिक जाधव आणि अरोरा यांनी राज्य सहकारी बँक प्रकरणात बोलाविलेली पत्रकार परिषद दादांच्या आसवांमध्ये वाहून गेल्याची चर्चा आहे. भक्त भक्त म्हणून धोपटणार्यांनी शोध पत्रकारिता करायला हरकत नसावी. असो, पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या आघाडीच्या नेत्यांनी मोठा गाजावाजा करून निवडणूक जाहीरनाम्याचं ’शपथनामा’ असं नामाभिधान केलंय.
1978 ते 1980, 1995 ते 1999 आणि 2014 नंतर आजपर्यंत हा अपवाद वगळता संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर काँग्रेसचेच सरकार राज्यात अस्तित्वात होते. 1978 ते 1980दरम्यान शरदरावच सरकार चालवत होते. इतकी वर्षे राज्य चालवताना शपथनाम्यातील बाबींचा विसर पडला होता का? 2008 साली मोठ्या सायबांनी 70,000 कोटींची कर्जमाफी केल्याचे तोंड फाटेपर्यंत सांगणारे हे बोलघेवडे नेते माधवराव भांडारी यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अजूनही देऊ शकले नाहीत. शपथनाम्यातील प्रत्येक मुद्द्यावर एकच वाक्य आपण वापरू शकतो. ते म्हणजे इतकी वर्षे सत्तेच्या खुर्च्या उबवत होतात तेव्हा निर्णय घ्यायला तुमचे हात कोणी बांधून ठेवले होते का? आम्ही सुसंस्कृत असल्यामुळे मोठ्या सायबांनी ’सोनियादूत पृथ्वीराज बाबां’च्या हाताला लकवा मारला व्हता काय? असा प्रश्न आजाबात इच्चारनार न्हाई. मराठी भाषेतील एक म्हण सतत डोक्यात येते, पेरले तसे उगवले! मारणार्याचे हात धरता येतात, पण बोलणार्याचे तोंड कसे धरणार? महाराष्ट्राच्या साडेअकरा बारामती कोटी नागरिकांना सुखी, समृद्धी, आनंदी, समाधानी, चिंतामुक्ती, मन:शांती देण्यासाठी दोन्ही काँग्रेसला कोणी अडविले होते काय? 2003 साली बाळासाहेब ठाकरे यांनी शेतकर्यांना वीज मोफत देऊ, अशी घोषणा केली, मात्र सुशीलकुमार शिंदे यांनी त्याचा फायदा उठवला आणि सरकार आल्यावर तीन महिने मोफत वीज देताना नंतर अव्वाच्या सव्वा बिले पाठवून सामान्य माणसाचे कंबरडे मोडले.
आता शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची घोषणा करणारे, सातबारा कोरा करू, असं म्हणणारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना आणि अन्य पक्षांतून नेत्यांना आयात करून आपल्या पक्षाची सूज वाढविणार्या राजकीय धुरिणांना जनाची नाही तर निदान मनाची तरी आहे की नाही? मागच्या निवडणुकीत ’या सरकारला लाज वाटते काय?’ अशा पोस्टर, होर्डिंग्ज लावणार्या आणि पान पान भरून जाहिराती देणार्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेतृत्वाला काहीच कसं वाटत नाही? वाटणार तरी कसं म्हणा. स्वत:चं ठेवावं झाकून आणि…! अशीच काहीशी परिस्थिती या विरोधकांची झाली आहे. एकीकडे चाचपडत असलेल्या विरोधकांच्या मदतीला ’लाव रे व्हिडीओ’वाले स्वत: मैदानात उतरले आहेत. खरं म्हणजे या नेत्यांना खरोखरंच जाणीव झाली आहे म्हणूनच आता त्यांनी मला एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून पुढे यायचंच. माझा आवाका मला माहीत आहे. मी एकटाच सत्ता घेऊ शकत नाही. किमानपक्षी जबाबदार विरोधी पक्ष तरी मजबुतीने बनविण्याची संधी मला द्या, अशी प्रांजळ कबुली दिली आहे. लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ही रथाची दोन चाके आहेत. ही दोन चाके समांतर रेषेत व्यवस्थित चालली तरच लोकशाही रथाची वाटचाल चांगल्या प्रकारे होऊ शकेल.
आपापल्या सामर्थ्याची अशी जाणीव जर प्रत्येकाला होऊ लागली तरच लोकशाहीला सुगीचे दिवस येतील. अर्थात जे राज ठाकरे यांना समजले ते राष्ट्रवादी काँग्रेसला अजूनही उमगलेले नाही असे वाटते. त्यातच सुशीलकुमार शिंदे यांनी ऐन
रणधुमाळीत आता आम्ही थकलो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना भविष्यात एक व्हावेच लागेल, असे सांगून एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना आपला मोर्चा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या महायुतीच्या नेत्यांवरचे लक्ष उडवून नाईलाजाने सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे वळवावे लागले. सुशीलकुमार शिंदे तसं पाहता अजिबात खोटं बोललेले नाहीत. त्यांनी वस्तुस्थितीचा आरसा पवारांसमोर धरलाय, पण ते अभी तो मैं जवान हूं! हा राग आळवताहेत. आळवू द्या बापुड्यांना, आपलं काय जातंय, पण एक मात्र पक्कं झालंय, महाराष्ट्रात शिवशाही एक डॉ. मनोहर गजानन जोशी आणि गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांच्या नेतृत्वाखाली 1995 साली आली होती.
2014ला शिवशाही दोन ही खणखणीत राजवट देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आली आणि आता देवेंद्र गंगाधरराव फडणवीस आणि उद्धव बाळ ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या शिवशाही तीन या 24 ऑक्टोबर 2019 नंतर येऊ घातलेल्या सरकारला कोणीही रोखू शकत नाही, सत्तेपासून वंचित ठेवू शकत नाही ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे हे नि:संशय. उद्धव ठाकरे यांनी 10 रुपयांत गरिबांना जेवणाची थाळी, एक रुपयात आरोग्य चिकित्सा, 300
युनिटपर्यंतच्या वीज देयकात 30 टक्के सूट, महाविद्यालयात शिक्षण मोफत, शालेय विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस प्रवासात सवलत आदी वचने दिली आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे नेते या वचनांना दिलदारपणा दाखवून समर्थन देत आहेत ही निश्चितच सुखावणारी बाब म्हणावी लागेल.
महायुतीच्या सर्व घटकांना विश्वासात घेऊन एकजिनसीपणा दाखवून मार्गक्रमण केले आणि सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास, हे सूत्र अंगीकारून राज्यशकट प्रामाणिकपणे, पारदर्शक आणि सुशासन यांच्या माध्यमातून काम केले, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस येती 25 वर्षे तरी सत्तेच्या जवळ फिरकू शकणार नाहीत. बोलबच्चन, बोलघेवड्या लोकांना दूर ठेवा आणि अंतर्गत मतभेदांना तिलांजली द्या. मनात कोणतेही किल्मिष न ठेवता एकदिलाने काम करा. यश तुमचेच आहे. ’देवेंद्रोद्धव’ आगे बढो, संपूर्ण महाराष्ट्र आपल्याकडे आशेने डोळे लावून बसलाय. मनापासून शुभेच्छा! जय हिंद, जय महाराष्ट्र!
-योगेश त्रिवेदी, मंत्रालय प्रहर