Breaking News

पीक विमा हप्त्याची रक्कम कमी करावी

सुधागडमधील शेतकर्‍यांचे तहसीलदारांना लेखी निवेदन

पाली : रामप्रहर वृत्त

पीक विमा योजने अंतर्गत नुकसानभरपाईची रक्कम लवकर मिळावी. तसेच विम्याच्या हप्त्याची रक्कम गेल्या वर्षी एवढीच करावी, अशी मागणी सुधागड तालुक्यातील शेतकर्‍यांनी केली आहे. किसन सन्मान शेतकरी गटाच्या वतीने या मागणीचे निवेदन बुधवारी (दि.18) तहसीलदारांना देण्यात आले. या वेळी गणपत सितापराव, निलेश शिर्के, आप्पा खताळ, चिमा वारगुडे, प्रदीप दोरे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

चक्रीवादळ व अतिवृष्टीमुळे सुधागड तालुक्यातील भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. तालुका कृषी कार्यालयाकडून नुकसानीचे पंचनामे उशिरा सादर झाल्यामुळे तालुक्यातील अनेक  शेतकर्‍यांना नुकसानीचा विमा मिळालेला नाही. कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले. यामध्ये शेतकरीसुद्धा बेजार झाला. अशातच विमा कंपनीने या वर्षी आंबा विमा हप्त्याच्या रकमेत चारपटीने वाढ केली आहे. मागच्या वर्षी हेक्टरी सात हजार रुपये विमा हप्ता होता, मात्र या वर्षी तो हेक्टरी 29 हजार 400 रुपये करण्यात आला आहे. या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत विमा हप्ता भरणे आवश्यक असताना, शेतकर्‍यांना पीक विमा योजने अंतर्गत मागील वर्षाची नुकसान भरपाईची रक्कम आजतागायत मिळालेली नाही. असे निवेदनात म्हटले आहे.

सुधागड तालुक्यात अनेक आदिवासी बांधवांनी शासनाने दिलेल्या दळी जागेत आंबा लागवड केली आहे. मागील काही वर्षे त्यांनी विमा भरला होता. मात्र आता त्यांना विमा हप्ता भरण्यास अडचणी येत आहेत. सातबारा विमा पोर्टलवर प्रमाणित होत नसल्याने विमा स्वीकारला जात नाही. या अडचणी दूर करून मागण्या पूर्ण कराव्यात, असे निवेदनात म्हटले आहे.

पीक विमा योजनेअंतर्गत तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांना नुकसान भरपाईची रक्कम अद्याप मिळालेली नाही, ती त्वरीत मिळावी. तसेच विमा हप्त्याची रक्कम पूर्वीप्रमाणे हेक्टरी सात हजार रुपये ठेवण्यात यावी. तालुका कृषी कार्यालयाकडून शेतकर्‍यांना विमा विषयात आवश्यक मदत मिळत नाही.

-निलेश शिर्के, अध्यक्ष, किसान सन्मान शेतकरी गट, पुई, ता. सुधागड

मागील वर्षी विमा हप्त्यामधील शासनाचा वाटा (शेअर) दिल्याने काही तालुक्यातील शेतकर्‍यांना भरपाई मिळाली आहे. विमा हप्त्याचा शासनाचा दुसरा वाटा दिल्यानंतर सुधागड व पेण तालुक्यातील शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळेल. शेतकर्‍यांना विमा भरपाई मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

-जे. बी. झगडे, तालुका कृषी अधिकारी, सुधागड

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply