Breaking News

डिजिटल मीडियाची चलती

फेसबुककडील आकडेवारीनुसार त्यांच्याकडील राजकीय जाहिराती महाराष्ट्रातील लाखो लोकांनी पाहिल्याचे दिसत असून गेल्या आठवडाभरात महाराष्ट्रात राजकीय पक्षांकडून फेसबुकवर लाखो रूपयांच्या जाहिराती प्रसारित केल्या गेल्या आहेत. समाजमाध्यमांच्या लोकप्रियतेमुळेच सर्वच पक्षांकडून या डिजिटल मीडियाला प्राधान्य दिले जाते आहे. डिजिटल माध्यम प्रभावी असले तरी, जनतेच्या मनात काय आहे ते ओळखून त्यानुसार प्रचाराची आखणी केली गेली तरच ती परिणामकारक ठरते.

प्रचाराच्या दृष्टीने यंदाची विधानसभा निवडणूक प्राधान्याने डिजिटल मीडियाची असल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. या वर्षीच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी राजकीय सल्लागारांनी समाजमाध्यमांचा अत्यंत खुबीने वापर केला होता. पाठोपाठ आलेल्या महाराष्ट्र व हरयाणा विधानसभा निवडणुकांमध्येही त्याच धोरणांचा पूरक म्हणून वापर केला जाताना दिसतो आहे. भारतीय जनता पक्षाने तर याही आधीपासून समाजमाध्यमांचा सर्वाधिक प्रभावीरीतीने प्रचारासाठी वापर केला आहे. यंदा इतर पक्षांनीही हाच कित्ता गिरवलेला दिसतो. अर्थात स्थानिक नेतृत्वापेक्षा दिल्लीला दंडवत घालण्यात धन्यता मानणार्‍या पक्षांची मदार यंदाही केंद्रातील नेतेमंडळींवरच आहे. बाहेरून आणून डोक्यावर बसवलेले नेते तळागाळातील पक्षकार्यकर्त्यांची मरगळ कशी दूर करणार? त्यामुळेच प्रचारात भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी घेतल्याचे स्पष्ट दिसते. विरोधक अद्यापही त्यासंदर्भात चाचपडतानाच नजरेस पडत आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत पक्षांकडून गाणी तयार करून ती सीडीमार्फत कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवली जात. परंतु आता फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपचाच याकरिता वापर केला जात असल्याचे स्पष्ट दिसते. पत्रक, फलक यांसारख्या पारंपरिक प्रचारयंत्रणांचा वापर तुलनेने बराच कमी झाला आहे. डिजिटल माध्यमाच्या लोकप्रियतेमुळे आपल्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पक्षांसोबतच उमेदवारांनीही आपापल्या कामांबद्दल गाणी व व्हिडिओ आदी डिजिटल कटेंट बनवल्याचे अनेक मतदारसंघात दिसते. पूर्वी पक्षाचे एकच गाणे सगळे उमेदवार वापरत. परंतु आता मात्र उमेदवारांनी वैयक्तिक कामकाजावर आधारित गाणीही बनवल्याचे दिसते आहे. हे अशा स्वरुपाचे डिजिटल कटेंट

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवरून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवणे सोपे असल्यामुळेच उमेदवारांनी त्यांची निवड केली आहे हे उघड आहे. पक्षांच्या यंत्रणा याच समाजमाध्यमांचा वापर करून जनमानसाचा अंदाज घेण्याचा, प्रत्येक मतदारसंघातील कल आजमावण्याचाही प्रयत्न करीत आहेत. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील कंपन्या मुंबई, पुणे, नाशिक यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये कॉल सेंटरमार्फतही पक्ष कार्यकर्ते आणि पाठिराख्यांशी संपर्क टिकवून असल्याचे सांगितले जाते. या कंपन्यांचा भर प्रामुख्याने तरुण मतदार व स्त्रियांशी संपर्क साधण्यावर असतो. डिजिटल माध्यमांचा संपर्कासाठी वापर केला जात असला तरी या यंत्रणेच्या केंद्रस्थानी बुथ व्यवस्थापन करणारे बुथ प्रमुखच असल्याचे मीडिया तज्ज्ञ सांगतात. यावेळी प्रचारासाठी उमेदवारांना कमी दिवस मिळाल्याने व बदलत्या काळानुसार घरोघरी जाऊन मतदारराजाशी संपर्क साधण्याऐवजी व्हॉट्सअ‍ॅपवरून प्रचाराचे कंटेंट पाठवण्यावर भर दिला जात आहे. प्रत्येक इमारतीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर ही माहिती पोहोचवण्याची जबाबदारी बुथप्रमुख त्या-त्या इमारतीतील पक्षाच्या

समर्थकांमार्फत पार पाडत आहेत. डिजिटल मीडियाची चलती असली तरी, वर्तमानपत्रांनाही विधानसभा निवडणुकांनी चांगला हात दिल्याचे दिसते.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply