Breaking News

काँग्रेसच्या बंडखोरांमुळे आदिती तटकरेंच्या अडचणींत वाढ

श्रीवर्धन मतदारसंघ हा सुरुवातीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला. त्यानंतर येथे शिवसेनेने आपले बस्तान बसवले. येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची फळी भक्कम आहे. त्यामुळेच श्याम सावंत येथे विजयाची हॅट्ट्रिक साधू शकले होते. एवढेच नाही तर श्याम सावंत यांनी शिवसेना सोडल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य असलेले तुकाराम सुर्वे यांनी श्याम सावंत यांचा पराभव केला होता, तो केवळ येथील कडवट शिवसैनिकांमुळेच, परंतु 2009पासून या मतदारसंघातील परिस्थिती बदलली. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेला. 2009 साली तुकाराम सुर्वे यांचा पराभव करून सुनील तटकरे विजयी झाले. 2014 साली अवधूत तटकरे विजयी झाले. 1995पासून शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्रीवर्धन मतदारसंघात मागील सलग दोन विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघात सुनील तटकरे यांच्या कन्या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे यांना उमेदवारी दिली आहे. म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. ही लढत एकतर्फी होईल असे सुरुवातीला वाटत होते, परंतु काँग्रेसच्या तीन पदाधिकार्‍यांनी बंडखोरी केली आहे. त्यातील दोन मुस्लिम आहेत. मुस्लिम लीगचा उमेदवारदेखील मुस्लिम आहे. या मतदारसंघात 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी खरी लढत आदिती तटकरे व विनोद घोसाळकर यांच्यातच होणार आहे. काँग्रेसचे दोन बंडखोर मुस्लिम उमेदवार व  मुस्लिम लीगचा उमेदवार हे तीन मुस्लिम उमेदवार किती मते घेतात यावर या मतदारसंघाचा निकाल अवलंबून राहणार आहे. 

श्रीवर्धन, म्हसळा, तळा हे तीन पूर्ण तालुके, तर माणगाव आणि रोहा तालुक्यातील काही भाग मिळून श्रीवर्धन मतदारसंघ तयार झाला आहे. काँग्रेसच्या बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून हा मतदारसंघ ओळखला जायचा. नंतर मात्र शिवसेनेने या मतदारसंघावर आपली पकड बसवली. शिवसेनेने सलग चार वेळा या मतदारसंघात विजय मिळवला आहे. काँग्रेसची ताकद कमी झाल्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला. सुनील तटकरे यांनी व्यूहरचना करीत  शिवसेनेच्या पारंपरिक मतदारसंघात शिरकाव केला. आपल्या पक्षाचे मजबूत संघटन बांधले. त्यामुळे सलग दोन वेळा या मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेला मतदारसंघ म्हणून तो ओळखला जातो.

या मतदारसंघात 10 जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत. यातील सात जिल्हा परिषदा राष्ट्रवादीच्या, तर तीन शिवसेनेच्या ताब्यात आहेत. श्रीवर्धन व रोहा या दोन नगरपालिका आणि माणगाव, म्हसळा नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आहे.  तळा नगरपंचायत शिवसेनेकडे आहे. मतदारसंघात दोन लाख 57 हजार 331 मतदार आहेत. यात एक लाख 25 हजार 965 पुरुष आणि एक लाख 31 हजार 298 महिला मतदारांचा समावेश आहे. मतदारसंघासाठी 14 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती सुनील तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून, तर म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी  मिळाली आहे. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष दानिश लांबे, म्हसळा तालुका काँग्रेस कमिटीचे मुहीज शेख यांनी बंडखोरी करत निवडणुकीत उडी घेतली आहे, तर मुस्लिम लीगने अकमल कादरी यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसच्या बंडखोरांमुळे आघाडीच्या मतांचे विभाजन होणार आहे.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांना विजयी करण्यात श्रीवर्धन मतदारसंघ महत्त्वाचा आहे. या मतदारसंघात सुनील तटकरे यांना 37 हजार मतांची आघाडी मिळाली होती. तीच आघाडी निर्णायक ठरली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आदिती तटकरे यांच्यासाठी हा मतदारसंघ सुरक्षित मानला जात होता, मात्र लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला गळती लागली. श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षाची जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे प्रमोद घोसाळकर हेदेखील शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद काही प्रमाणात कमी झाली आहे. शिवसेनेत या मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यावरून अंतर्गत वाद होते. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमधील उमेदवारीवरून होणारे संभाव्य वाद थांबले. 2014 साली कृष्णा कोबनाक यांनी शिवसेनेतून भाजपत प्रवेश करून निवडणूक लढवली होती. तरीही अवधूत तटकरे अवघ्या 77 मतांनी विजयी झाले होते. हेच कृष्णा कोबनाक भाजपत असले तरी सध्या ते शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांचा प्रचार करीत आहेत. युतीत वाद दिसत नाहीत. याउलट आघाडीत मात्र बिघाडी आहे. काँग्रेसच्या तीन नेत्यांनी बंडखोरी केली आहे. काँग्रेसच्या तीन बंडखोरांनी निवडणुकीत उडी घेतल्याने राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मुस्लिम मते ही काँग्रेसची पारंपरिक वोटबँक आहे. याच मतदारसंघात काँग्रेसचे दोन बंडखोर उमेदवार मुस्लिम आहेत. मुस्लिम लीगचाही उमेदवार आहे. या तिघांना किती मते मिळतात यावरच या मतदारसंघाचा निकाल अवलंबून राहणार आहे.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply