Sunday , September 24 2023

इर्शाळवाडीतील मृतांचा सामुदायिक दशक्रिया विधी

खालापूर, चौक ः प्रतिनिधी
इर्शाळवाडीतील दरड दुर्घटनेला शुक्रवारी (दि. 28) दहा दिवस पूर्ण झाले. या वाडीतील मृतात्म्यांचा रिवाजाप्रमाणे दशक्रिया विधी करण्यात आला. नम्राची वाडी येथील मोरबे धरणाला येऊन मिळणार्‍या नदीकिनारी हा सामुदायिक विधी शोकाकुल वातावरणात झाला. या वेळी नातेवाईक, आसपासचे रहिवासी आणि शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
इर्शाळवाडी दुर्घटनेत ढिगार्‍याखाडी गाडले गेलेल्यांपैकी 29 जणांचे मृतदेह शोधकार्यात हाती लागले, तर 57 बेपत्तांना मृत घोषित करण्यात आले होते. या सर्वांचा दशक्रिया विधी शुक्रवारी झाला. या वेळी सुमारे 270 जणांनी आपले केस देऊन श्रद्धांजली अर्पण केली.
दशक्रिया विधीसाठी लागणारे साहित्य व होमहवनाचा खर्च उपविभागीय अधिकारी अजित नैराळे व तहसीलदार आयुब तांबोळी यांनी केला, तर चौक नाभिक समाजाच्या कार्यकर्त्यांनी मंगेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोफत केसकर्तन केले. या वेळी मृतांच्या नातेवाईकांसह प्रशासनातील अधिकारी-कर्मचार्‍यांचेही डोळे पाणावले.

Check Also

महाडच्या गोमुखी आळीतील शतकोत्तर दशकपूर्ती गणेशोत्सव

महाड ः रामप्रहर वृत्त ऐतिहासिक व सामाजिक क्रांतीचे ठिकाण म्हणून शिवकाळापासून नोंद झालेल्या महाड शहरातील …

Leave a Reply