Breaking News

विजयाकडे वाटचाल

विरोधकांची अशी दयनीय अवस्था असताना सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांच्या महायुतीला पराजयाचे भय नसल्याचेच सिद्ध होते. विविध निवडणूक अंदाज संस्थांनी जाहीर केलेल्या ताज्या पाहणीतही महायुतीच्या विजयाचे स्पष्ट प्रतिबिंब उमटलेले दिसते.

गेले जवळजवळ महिनाभर सुरू असलेली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज (शनिवारी) सायंकाळी पाच वाजता संपुष्टात येईल. नेहमीप्रमाणे या निवडणुकीतही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. काही प्रमाणात चिखलफेकही झाली. निराशेच्या गर्तेत गेलेल्या विरोधकांनी पातळी सोडून प्रचार करणे स्वाभाविकच होते. एवढे होऊनही या निवडणुकीत फारशी मजा नाही असेच सामान्य मतदार म्हणेल कारण महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच एक कमालीची एकतर्फी निवडणूक सार्‍यांना पहायला मिळते आहे. वस्तुत: चांगला विरोधी पक्ष असणे लोकशाहीला सुदृढ करणारे असते. परंतु दुर्दैवाने चांगला विरोधीपक्ष देण्याचे बळही विरोधकांमध्ये उरलेले नाही. भारतीय जनता पक्षाच्या प्रचारमोहिमेचा नारळ फुटण्याआधीच ही निवडणूक कमालीची एकतर्फी होणार हे दिसू लागले होते. निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यव्यापी महाजनादेश यात्रा काढून मतदारांशी संपर्क साधला. या यात्रेला मिळालेल्या उदंड प्रतिसादातून निवडणुकीचा निकाल काय लागणार हे उघड झाले होते. म्हणूनच प्रचाराच्या पहिल्या काही सभांमध्येच मुख्यमंत्र्यांनी या निवडणुकीत मजा नाही असे दिलखुलास वक्तव्य केले होते. ‘आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत, पण मैदानात कुणी उतरतच नाही’ हा त्यांनी लगावलेला टोमणा विरोधकांपैकी काहींच्या जिव्हारी लागला असावा. परंतु वास्तवत: भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे दोन सत्ताधारी पक्ष वगळता कुठल्याही विरोधी पक्षाला प्रचारादरम्यान सूरच गवसला नाही असे म्हणावे लागेल. कोणतेही ठोस मुद्दे हाती नसल्यामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून खालच्या पातळीवरची गलिच्छ टीकाटिप्पणी मात्र केली गेली. काँग्रेस पक्षाची अवस्था अगदीच केविलवाणी झाली असून त्यांचे तमाम बडे नेते रांगेने सत्ताधारी पक्षात प्रवेश घेते झाले. प्रचाराला नेता उरला नाही अशी या पक्षाची तूर्तास स्थिती आहे. या पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी बराच काळ गायबच होते. नंतर त्यांनी नावापुरत्या एक-दोन सभा घेतल्या. परंतु लोकसभा निवडणुकीतीलच भाषा बोलणार्‍या राहुल गांधींनी तयारी न केल्याचे स्पष्ट दर्शन घडले. सोनियाजी तर फिरकल्या देखील नाहीत. नाही म्हणायला, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग मुंबईत येऊन अर्थव्यवस्था आदींबद्दल बोलून गेले. परंतु एखादी पत्रकार परिषद वगळता त्यांच्या हातून कुठलेही पक्षकार्य घडले नाही. विरोधी आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काही ठिकाणी प्रचारात उत्साह दाखवला हे खरे, परंतु त्यांची सारी मदार ही आपल्या एकमेव ज्येष्ठ संस्थापक नेत्यावरच राहिली. अन्य विरोधी पक्षांबद्दल काय बोलावे? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरे यांनी मतदारांकडे मागणीच मुळी ‘आम्हाला विरोधीपक्ष करा’ अशी केली आहे. सत्ता आवाक्यात नसल्याची जणु जाहीर कबुलीच त्यांनी यातून दिली. सत्ता नाही तर किमान विरोधीपक्षाच्या बाकांवर बसण्याची संधी तरी मिळावी अशी त्यांचे मतदारांना आवाहन आहे. गेल्या पाच वर्षांत देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने राज्यात घडवून आणलेला विकास आणि राजकीय वातावरणातील बदल याचेच फलित म्हणून यंदाच्या निवडणुकांकडे पाहता येईल.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply