Breaking News

वाशी विभागाचा पाणीप्रश्न सुटणार

आमदार रविशेठ पाटील यांची ग्वाही; काळेश्री हद्दीत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पेण : प्रतिनिधी

मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पेण वाशी खारेपाट विभागातील पाणी टंचाईचा प्रश्न या मे महिना अखेरीस मार्गी लागून प्रत्येक घरात नळाचे पाणी येणार, असा विश्वास पेणचे आमदार रविशेठ पाटील यांनी काळेश्री येथे बोलताना व्यक्त केला.

पेण तालुक्यातील काळेश्री ग्रामपंचायत हद्दीतील काळेश्री ते वाशी प्राथमिक आरोग्य केंद्र या आठ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दुसर्‍या टप्प्याच्या कामाचे भूमिपूजन तसेच निवारा शेडचे भूमिपूजन आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते रविवारी (दि. 13) करण्यात आले.

या वेळी भाजप पेण तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, माजी सरपंच तुळशीदास पाटील, नरदास पाटील, अशोक पाटील, राजन पाटील, हेमंत ठाकूर, सिद्धार्थ म्हात्रे, काळेश्री ग्रामपंचायत सदस्य मनिषा म्हात्रे, आनंद ठाकूर, उत्तम म्हात्रे आदी उपस्थित होते.

या वेळी आमदार रविशेठ पाटील म्हणाले की, वाशी-वढाव विभागाचे माझ्यावर व माझे या विभागाबरोबर प्रेमाचे नाते आहे. या विभागाने विधानसभा निवडणुकीत मला साडे दहा हजार मतांचे मताधिक्य देऊन मला आमदार केले आहे. आपण राजकारणात सक्रिय झाल्यापासून या विभागासाठी विविध विकासकामे करत आलो आहे. आपल्या मंत्रीपदाच्या काळात आपण कोटी रुपयांचा निधी खर्च करून या विभागात विकासकामे केली आहेत. आज मंत्री नसलो तरी एखाद्या मंत्र्यापेक्षा आजही विकास कामे करत असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले.

या विभागातील पाणीपुरवठा योजनेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 38 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. या पाणीपुरवठा योजनेसाठी नेमण्यात आलेला पहिल्या कंत्राटदारामुळे हे काम रखडले होते. मात्र आपण आमदार झाल्यानंतर नवीन कंत्राटदार नेमण्यात आला असून मे अखेर पर्यंत ही योजना कार्यान्वित होऊन प्रत्येक घरात नळाचे पाणी पोहचेल, असा विश्वास आमदार रविशेठ पाटील यांनी या वेळी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर जल या योजने तुन अंतर्गत नळ पाइपलाइनसाठीदेखील अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती पाटील यांनी दिली. विकासकामे करताना हेवेदावे, राजकारण थांबवले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी शेवटी विरोधकांना उद्देशून व्यक्त केली.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply