Breaking News

भाजपच्या ताकदीमुळे सेनेच्या उमेदवाराचा फायदा

अलिबाग-मुरूड मतदारसंघात शिवसेनेचे महेंद्र दळवी विरुद्ध शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार पंडितशेठ पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे. भारतीय जनता पार्टीची साथ लाभल्याने शिवसेनेचे पारडे जड झाले आहे. भारतीय जनता पार्टीचे अलिबाग-मुरूड विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची संख्या वाढवल्याने भारतीय जनता पार्टीची मते मोठ्या संख्येने वाढल्याचे दिसून येत आहे. अलिबागप्रमाणे मुरूड तालुक्यात भारतीय जनता पार्टीची मतदारसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

या मतदारसंघात एकूण मतांच्या 15 टक्के मतदार भारतीय जनता पार्टीचे असल्याने शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी यांचा विजय निश्चित मानला जात आहे. शिवसेना व भारतीय जनता पार्टीची युती होऊ नये यासाठी विरोधक देव पाण्यात घालून वाट पाहत होते, परंतु भारतीय जनता पार्टी व शिवसेनेची युती झाल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. भारतीय जनता पार्टीची या मतदारसंघात बघता बघता मोठी  मतदारसंख्या झाल्याने शेतकरी कामगार पक्ष भांबावून गेला आहे. रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सिडको अध्यक्ष व आमदार प्रशांत ठाकूर यांचे वेळोवेळी सहकार्य मिळाल्यामुळे येथे झटपट विकासकामे होऊन मतदारसंख्या वृद्धिंगत होण्यास मदत झाली आहे.   विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019करिता मुरूड तालुक्यातून 63 हजार 470 मतदार असून त्यामध्ये दिव्यांग मतदारसंख्या 602 आहे. त्यात  181 महिला, तर 421 पुरुष मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अलिबाग-मुरूड मतदारसंघात एक लाख 46 हजार 84 पुरुष, तर एक लाख 48 हजार 50 महिला अशी एकूण मतदारसंख्या 2 लाख 94 हजार 134 असून, अलिबाग नगर परिषदेवर शेतकरी कामगार पक्षाची, तर मुरूड नगर परिषदेवर शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. मुरूड तालुक्यातून  मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिला मतदार सर्वाधिक असून यामध्ये 30 हजार 815 लाख पुरुष, तर 31 हजार 448 महिला मतदार आहेत. त्यामुळे महिलांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. विधानसभा मतदारसंघात शेकापचे उमेदवार पंडितशेठ पाटील व महायुतीचे महेंद्र दळवी यांच्यातच सरळ लढत होणार आहे, परंतु अपक्ष उमेदवार राजेंद्र ठाकूर हेसुद्धा विजयासाठी खूप प्रयत्न करीत असून त्यांच्या मतसंख्येवर विजयी उमेदवाराची मदार असणार आहे. सलग दोन वेळा विधानसभेेवर जाण्याची संधी आमदार पंडितशेठ पाटील यांच्यासमोर असली तरी महायुतीचे महेंद्र दळवी यांनासुद्धा कमी लेखून चालणार नाही. शेकाप व राष्ट्रवादी अशी युती अलिबाग मतदारसंघात आहे. यंदाच्या आमदारकीच्या निवडणुकीत काश्मीरचे कलम 370 व राष्ट्रीय सुरक्षेला दिले गेलेले महत्त्व यामुळे सुक्षिक्षित मतदारवर्ग निश्चितच भाजप-शिवसेना महायुतीच्याच उमेदवारांचा विचार करणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.केंद्रात मोदी सरकार व

राज्यातसुद्धा भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचेच उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून येणार, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. मुरूड तालुक्यात युवावर्गाची नवीन मतेसुद्धा दाखल झाल्याने या युवावर्गाचा कौल शिवसेना, भाजपच्या बाजूनेच आहे. हेसुद्धा राजकीय गणिते बदलण्यास महत्त्वाची भूमिका बजावणार असून याचा फायदा शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी यांनाच होणार आहे. भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचे कार्यकर्ते एकदिलाने काम करीत असून शिवसेनेचा उमेदवार निवडून येण्यासाठी कष्ट घेताना दिसत आहेत.

अलिबाग-मुरूड विधानसभा क्षेत्रात शिवसेनेच्या उमेदवाराची सरशी होणार असून एक अनोखा निकाल या मतदारसंघात पाहावयास मिळणार आहे. मुस्लिम मतदारांचा टक्का वाढलेला असून या मतदारसंघात त्यांचा झुकाव कोणाकडे असणार हेसुद्धा पाहणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे. एकाच पक्षाकडे मुस्लिम समाजाची मते पडली तर त्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जात आहे. यंदाच्या निवडणुकीत मुस्लिम मतदार शिवसेना-भाजपकडे वळला आहे. विकासकामे होण्यासाठी असंख्य मुस्लिम बांधवांनी पक्षप्रवेश करून दोन्ही पक्षांची ताकद वाढविली आहे.सध्या सर्वच राजकीय मंडळी भेटीगाठी घेण्यात गुंतली आहेत. नेतेमंडळी लोकांच्या गाठीभेटी घेताना दिसत असून प्रचारसभांनासुद्धा जास्त गर्दी पाहावयास मिळत आहे. अलिबाग-मुरूड विधानसभा क्षेत्र हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो, परंतु खासदारकीच्या निवडणुकीत अलिबाग तालुक्यातून शेकापला कमी मताधिक्य मिळाल्याने सर्वच राजकीय निरीक्षकांनी चिंता व्यक्त केली आहे. जी परिस्थती लोकसभा निवडणुकीत होती तशीच आता आहे. त्यामुळे यंदा अलिबाग-मुरूड विधानसभा क्षेत्रात बदल घडलेला दिसणार असून भाजप-शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी विजयी होणार असल्याचे चित्र आजघडीला दिसत आहे. एकंदरीत अलिबाग-मुरूड मतदारसंघात या वेळी परिवर्तन होईल अशी शक्यता आहे.

-संजय करडे, खबरबात

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply