खोपोली ः प्रतिनिधी
सुसाट्याचा वारा व सतत कोसळत असलेल्या पावसामुळे शुक्रवारी सकाळी खपोलीतील वासरंग गावातील रहिवासी चाळीवर भलेमोठे झाड कोसळले. झाड कोसळल्याने दोन घरांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही. या घटनेची माहिती स्थानिक नगरसेवक मंगेश दळवी व नितीन मोरे यांनी खोपोली नगरपालिका, अग्निशमन दल व खोपोली आपत्कालीन स्थितीत मदत करणार्या सामाजिक ग्रुपच्या सदस्यांना कळविली. काही वेळातच यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. सर्वांनी मोठी मेहनत घेऊन कोसळलेल्या झाडांच्या फांद्या कापून बाजूला केल्या, तसेच कोसळलेले झाडही हटविले. या वेळी नगरसेवक मंगेश दळवी, किशोर पानसरे यांनी घटनास्थळी पूर्ण वेळ उपस्थित राहून सहकार्य केले. नगरपालिका उद्यान विभाग कर्मचारी, अग्निशमन दल व गुरुनाथ साठेलकर यांच्या नेतृत्वाखाली खोपोली आपत्कालीन स्थितीत मदत करणार्या सामाजिक ग्रुपच्या सदस्यांनी, तसेच स्थानिक रहिवासी तरुणांनी या सर्व परिस्थितीत महत्त्वपूर्ण मदतकार्य करून, मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान टाळले. या वेळी नगरसेवक मंगेश दळवी यांनी नुकसान झालेल्यांना नगरपालिकेकडून नुकसानभरपाई मिळण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.