पाली ः प्रतिनिधी
बहुतांश वेळेला चोरीला गेलेल्या ऐवजावर अनेकांना पाणी सोडावे लागते. मात्र सुधागड तालुक्यातील पाली येथील विशाल शिंदे यांच्या घरातील चोरीला गेलेला ऐवज पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे मिळाला. आपल्या चोरीला गेलेल्या दागिन्यांवर पाणी सोडून दिलेल्या विशाल शिंदे यांना सुखद अनुभव मिळाला आहे. विशाल नामदेव शिंदे (रा. हरिओम वास्तू सोसायटी, समर्थ नगर पाली ब्लॉक न. 205, ता. सुधागड)यांच्या घरात काही महिन्यांपूर्वी चोरी झाली होती. या चोरीत 30000 रू. किमतीची एक सोन्याची गोफ असलेली चैन व त्यामध्ये सोन्याचे पॅण्डल, 14000 रू. एक काळया मण्याचा सर, त्यामध्ये सोन्याचे मनी व दोन सोन्याच्या वाट्या व पाच ग्रॅम वजनाचा ऐवज, 5000 रू. कानातील झुमक्यांचा जोड असे एकूण 49000 हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले होते. पाली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार पोलिसांनी गुन्ह्याचा कसून तपास करीत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. व त्यांच्याकडून एक सोन्याचा गोफ असलेली चैन व एक सोन्याचा सर असा 35000 रुपये किमतीचा ऐवज ताब्यात घेतला. या प्रकरणातील आरोपीत सुनिल लाल सिंग मुझालदा, वय 22, रा. घोर, पोष्ट तांडा, मध्यप्रदेश, रवी उर्फ छोटू मोहन डावर, रा. जवार टेकडी, इंदोर, राज्य- मध्यप्रदेश यांचा समावेश आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पाली पोलीस निरीक्षक तृप्ती बोराटे करीत आहेत.