दिवाळी आली, ऑक्टोबर संपायला आला तरी पाऊस जाण्याचे नाव घेत नाही. परतीचा पाऊस झोडपतच आहे. कोकणात भातशेती हे मुख्य पीक घेतले जाते. यंदा सुरुवातीला चांगला पाऊस झाला. त्यामुळे पीक चांगले आले. लावणीसाठी पावसाची वाट पाहावी लागली नाही, पण भातपीक हाताशी आले व शेतकर्यांच्या हातचा घासच निघून गेला आहे. पावसामुळे शेतकर्यांची अडचण झाली. कापणी करता आली नाही. पीक भिजले. परिणामी कापणीपूर्वीच उभ्या पिकातील दाण्याला कोंब आले. शेतकर्यांवर मोठे संकट कोसळले आहे. ओला दुष्काळ पडला आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. सरकारने या मागणीचा विचार करायला हवा.
ओला दुष्काळ म्हणजे, एखाद्या विशिष्ट क्षेत्रात काही काळ सतत वा नेहमीच्या पर्जन्यमानापेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे पिकांची झालेली हानी. पुरामुळे जीव व वित्तहानी, पाण्याचा सुकाळ अशी परिस्थिती उद्भवणे होय. ही परिस्थिती दुष्काळाच्या बिलकुल विरुद्ध असते. यंदा नेमकी हीच स्थिती झाली. पाऊस जून संपल्यावर दाखल झाला, पण नंतर तो मुसळधार कोसळला. केवळ कोसळला नाही तर इतका बरसला की महापूर आला. पश्चिम महाराष्ट्रात या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. कोकणातही महापूर आला. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेच, पण शेतीला मोठा फटका बसला. पश्चिम महाराष्ट्रात शेतीचे मोठे नुकसान झाले. तिथला शेतकरी आर्थिक संकटात आहे. कोकणातही हीच परिस्थिती आहे. कोकणात भातपीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. रायगड जिल्ह्याला यापूर्वी भाताचे कोठार म्हणून ओळखले जायचे. आता भातशेती कमी होत असली, तरी इथले प्रमुख पीक आजही शेतीच आहे, परंतु परतीच्या पावसाने या पिकाची वाट लावली आहे. पावसामुळे हाताशी आलेले पीक शेतकर्यांना कापून घरी घेता आले नाही. भारतात प्रतिवर्षी सरासरी 1,100 मिलीमीटर एवढा पाऊस होतो. देशातील 3,14,400 वर्ग किलोमीटर एवढा भाग पाण्याने व्यापलेला आहे. वापरात असलेल्या पाण्यापैकी 92 टक्के पाण्याचा शेतीच्या जलसिंचनासाठी उपयोग केला जातो. कोरड्यानंतर आता ओल्या दुष्काळाचे चक्र महाराष्ट्रात फिरू लागले आहे. 2017मध्ये भारतातील 40 टक्के जिल्ह्यांना अवर्षण, तर 25 टक्के जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली होती. 29 ऑगस्ट 2017 रोजी मुंबईत सुमारे 300 मिमी पाऊस पडला होता. 2010, 2013, 2016 या वर्षीदेखील महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ओला दुष्काळ पडला होता. ओला दुष्काळ कधीतरी पडत असतो. विशिष्ट क्षेत्रात काही काळ सतत वा नेहमीच्या पर्जन्यमानापेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे पिकांची मोठी हानी होते, पुरामुळे जीव व वित्तहानी, पाण्याचा सुकाळ अशी परिस्थिती निर्माण होते. ही परिस्थिती सध्या कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात आहे. एका दाण्याचे हजार दाणे करण्याची क्षमता आणि दानत असलेला शेतकर्यांवर आज संपावर जाण्याची वेळ आली आहे. अधिकृत कागदोपत्री 30 सप्टेंबरला मान्सून संपतो. तरी ऑक्टोबरमध्येही महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. तो जाण्याचे नाव घेत नाही. अजूनही बरसत असलेल्या पावसामुळे भातशेती पाण्यात गेली आहेच, तशीच पुढील पावटा, तूर ही पिकेही धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करीत आहेत. सरकारने या मागणीचा गांभीर्याने विचार करायला हवा. भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे करावे व शेतकर्याला भरपाई द्यावी, अशी माफक अपेक्षा आहे.