पाली : प्रतिनिधी
मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर नागोठणेतील कोलेटी गावाच्या नजीक बुधवारी रात्रीच्या सुमारास भरधाव वेगात येणारा केमिकलचा टँकर पलटी झाला. अचानक टँकर पलटी झाल्याने दोन प्रवासी वाहनांना टँकरची धडक बसून या वाहनांनी पेट घेतला. सुदैवाने प्रसंगावधान राखून देन्ही वाहनांतील प्रवासी कारबाहेर पडल्याने जीवितहानी टळली, मात्र या अपघातामुळे पाच तास महामार्ग ठप्प झाला होता.
नागोठणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व ऋषिकेश विनायक बागवे यांच्या फिर्यादिनुसार, बुधवारी (दि. 4) रात्रीच्या सुमारास टँकर (क्र. एमएच 04 केयु 5739)वरील चालक हा भरधाव वेगात वडखळहून नागोठणेकडे मुंबई-गोवा हायवेने जात होता. त्या वेळी अचानक त्याचे टँकरवरील नियंत्रण सुटले आणि टँकर रस्त्यावरच पलटी झाला. यामुळे नागोठणेहून वडखळकडे जाणारी इर्टिका कार (नं. एमएच 08 एएन 5349) व हुन्डाई अल्काझर कार (नं. एमएच 46 बीझेड 4236) यांना टँकरची धडक बसली. अपघातात दोन्ही कारने पेट घतला. सुदैवाने कारमधील प्रवासी प्रसंगावधान राखून त्वरीत कारबाहेर पडल्याने जीवितहानी टळली. अपघातात साक्षीदार दर्याकुवर खिमसिंह राजपुत यांना किरकोळ दुखापत झाली असून आरोपी टँकरचालक याने अपघात झाल्यावर घटनास्थळावरून पळ काढल्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …