पनवेल : वार्ताहर
प्रोजेक्ट रेड डॉट उपक्रम महिलांना गेल्या 18 महिन्यापासून वापरलेले पॅड लाल वर्तुळ असलेल्या प्रोजेक्ट रेड डॉटच्या पिशवीत टाकण्यासाठी आवाहन करीत आहे. मुंबईत सुरू झालेल्या या उपक्रमाने विविध शहरात याचे अॅम्बेसेडर नेमण्यात या उपक्रमाचे संस्थापक विकास मोतीराम कोळी यांना यश लाभले आहे. प्रोजेक्टच्या सुरुवातीला दीड लाखापेक्षा जास्त मोफत प्रोजेक्ट रेड डॉटच्या पिशव्या वाटप करून सुरुवात करण्यात आली, आज या उपक्रमाला विविध स्तरावर महिलांना माहिती झाली आहे. हा उपक्रम प्रामुख्याने महिलांचा मासिक पाळीचा कचरा वेगळा होण्यासाठी जरी असला, तरी यातील आतील संदेश अगदी महत्त्वाचा आहे. हा कचरा वर्तमानपत्रात किंवा प्लास्टिक पिशवीत गुंडाळण्याच्या महिलांच्या सवयीमुळे सफाई कामगाराना जेव्हा हा कचरा हाताळावा लागतो तेव्हा त्यांच्या उघड्या हाताच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना विविध आजार होण्याची शक्यता बळावते. प्रोजेक्ट रेड डॉट पिशवीच्या वर्तुळामुळे अशिक्षित किंवा अर्धसाक्षर कामगारांना ते कचर्यात सहज ओळखता येईल, तसेच काही महिला हे वापरलेले पॅड्स टॉयलेटमध्ये फ्लश करतात. त्यामुळे गटारे तुंबतात आणि काही पॅड्स समुद्राला जाऊन मिळतात आणि त्याचा कचरा किनार्यावर प्लास्टिकसकट विखुरलेला दिसतो. ज्यामुळे जैवविविधतेलासुद्धा बाधा येते, असे प्रोजेक्ट रेड डॉटचे संस्थापक विकास मोतीराम कोळी म्हणाले. विविध गृहनिर्माण सोसायट्या, संस्था, महाविद्यालये येथे आम्ही आतापर्यंत उपक्रम राबविला आहे. जर याची लक्षणीय सुरुवात विविध भागांत झाली, तर त्या कचर्याला योग्यरीत्या वेगळे करता येईल आणि त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावता येईल, असे स्त्रीशक्ती फाऊंडेशनच्या अध्यक्ष विजया कदम यांनी सांगितले.