पनवेल : वार्ताहर
केटामाईन पावडर या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी पनवेल भागात आलेल्या संभाजी अर्जुन सोनवणे (30) याला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा लावून अटक केली. पोलिसांनी या आरोपीच्या ताब्यातून तब्बल 26 लाख रुपये किमतीचा 650 ग्रॅम वजनाचा केटामाईन हा अमली पदार्थ जप्त केला आहे.
पनवेल भागात एक व्यक्ती केटामाईन हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी कक्षाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश माने, विनया पारासुर व त्यांच्या पथकाने पनवेलमधील जुन्या मुंबई-पुणे मार्गावरील कोळखे गाव येथील वेल्वेट ट्रीट फुडकोर्ट हॉटेलजवळ सापळा लावला होता. या वेळी त्या ठिकाणी संशयास्पदरीत्या आलेल्या संभाजी अर्जुन सोनवणे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ सुमारे 26 लाख रुपये किमतीची 650 ग्रॅम वजनाची केटामाईन पावडर सापडली. त्यामुळे पोलिसांनी अमली पदार्थ जप्त करून संभाजी सोनवणे याला एनडीपीएस कलमाखाली अटक केली. न्यायालयाने त्याला 18 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक तपास करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांनी दिली.