पनवेल : बातमीदार
प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून त्याचा मृतदेह गोणीत भरून फेकून देणार्या दोघांना तळोजा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नी रंजूबाई व प्रियकर कार्तिक ऊर्फ कौशिक अशी आरोपींची नावे असून दोघांना 15 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
एस. एम. कन्स्ट्रक्शनचे तळोजा फेज 2 या ठिकाणी आरसीसी बांधकाम व प्लास्टरचे काम चालू आहे. 7 नोव्हेंबर रोजी तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एस. एम. कन्स्ट्रक्शनच्या कामगारांना कचर्याच्या ढिगार्यातून उग्र वास येऊ लागला. त्यामुळे त्यांनी कचर्याच्या ढिगार्यावरील गोण्या कामगारांच्या सहाय्याने बाजूला करून पाहिले असता एका गोणीमध्ये पुरुषाचा मृतदेह सापडला. तेथील कामगारांनी सदरचा मृतदेह हा त्याच ठिकाणी काम करणार्या मनोज मांजी याचा असल्याचे सांगितले.
अधिक तपास करता पत्नी रंजूबाई व प्रियकर कार्तिक उर्फ कौशिक यांनी मनोज याची उशीच्या साहाय्याने तोंड दाबून हत्या केली होती व त्याचा मृतदेह गोणीमध्ये भरून तो कन्स्ट्रक्शन साईडवरील कचर्याच्या ढिगार्यामध्ये टाकून ते पसार झाले होते. तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण, पोलीस निरीक्षक राजू अडागळे व गुन्हे प्रकटीकरण शाखेने दोघांची माहिती घेतली व कार्तिकला हा तो राहत असलेल्या खोलीतून घाईगडबडीत निघून जात असताना पकडले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.