Breaking News

शिवप्रेमी, दासभक्त, पर्यटकांसाठी शुभवर्तमान; शिव-समर्थ स्मारक फेब्रुवारीत सर्वांसाठी खुले!

उरण : प्रतिनिधी

30 कोटी खर्च करुन जेएनपीटीकडून उरण येथे उभारण्यात येत असलेले 20 मीटर उंचीच्या शिवस्मारकाचे काम जानेवारी महिन्याअखेरीस पुर्णत्वास जाणार आहे. विविध सुविधा असलेले भव्य स्मारक येत्या फेब्रुवारीत सर्वांसाठी खुले होणाऱे शिवस्मारक देशभरातील शिवप्रेमी, दासभक्त, पर्यटक आणि नागरिकांसाठी शुभवर्तमान ठरणार आहे. उरणचे आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने या शिवस्मारकाचे काम पुर्णत्वास येत आहे. जासई-दास्तानफाटा दरम्यान जेएनपीटी प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी 19.3 मीटर उंचीचे शिवस्मारक उभारण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. नऊ हजार चौरस मीटर क्षेत्रात हे शिवस्मारक उभारण्यात आले आहे. तळ मजल्यावर 480 चौरस मीटरचा सभागृह आहे. तेथे कॅन्टीन, ग्रीनरुम आणि संग्रहालय उभारण्यात आले आहे. संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक वस्तू ठेवण्यात येणार आहेत. पहिल्या मजल्यावर दोन खुल्या बाल्कनी असून या बाल्कनीमधून निसर्गमय परिसर न्याहाळता येणार आहे. दुसर्‍या मजल्यावर एक्झीब्युशन हॉलची निर्मिती करण्यात आली आहे. या हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक ऐतिहासिक चित्र, शिल्प, पेन्टींगचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे.  तिसर्‍या आणि चौथ्या मजल्यावर चहुबाजूंनी परिसरातील देखाव्यांची लज्जत घेण्यासाठी विह्यूज गॅलरी आणि महाराजांच्या जीवनपटावर ऑडिओ व्हिज्युअल सिस्टीमची व्यवस्था करण्यात आली आहे. या मिनी थिएटरमध्ये प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्टेजच्याच मागे एमपी थिएटर उभारण्यात आले आहे. थिएटरमध्ये 250 प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. पाचव्या अखेरच्या मजल्यावर सहा मीटर उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि चार मीटर उंचीचा समर्थ रामदास स्वामी यांचा अष्टधातुंचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या या स्मारकाची तळमजल्यापासून उंची 19.3 मीटर आहे. राज्यातील इतक्या मोठ्या उंचीचे हे एकमेव स्मारक असल्याचे जेएनपीटी प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तत्कालिन जेएनपीटी विश्वस्त आणि उरणचे विद्यमान आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्यामुळे हे भव्य स्मारक उदयास आले आहे.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply