Breaking News

विकासाची मोठी भरारी घेण्यास कोकण सज्ज; मुख्यमंत्र्यांचा विश्वास; चिपी विमानतळ इमारतीचे उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी ः प्रतिनिधी

 गेल्या चार वर्षांच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न 71 हजारांवरुन एक लाख 40 हजारांपर्यंत गेले आहे. महामार्ग रुंदीकरण, बंदर विकास, मत्स्यव्यवसाय विकास, पर्यटन, हवाई सेवा या माध्यमातून विकासाची मोठी भरारी घ्यायला सिंधुदुर्ग जिल्हा सज्ज झाला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. सिंधुदुर्ग विमानतळाच्या (चिपी) टर्मिनल इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.

   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय उद्योग, वाणिज्य व नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार नारायण राणे, खासदार विनायक राऊत, विधान परिषद सदस्य आमदार निरंजन डावखरे, बाळाराम पाटील, आमदार वैभव नाईक, नितेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एन. वासुदेवन आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या उद्घाटन सोहळ्याबरोबरच चांदा ते बांदा अंतर्गत लाभार्थींना प्रमाणपत्र वितरण तसेच विविध प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा तसेच विकासकामांचा भूमिपूजन सोहळा या वेळी संपन्न झाला.

विमानतळामुळे विकासाची गती तिप्पट

   जिल्ह्यातून जाणारा रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्ग यामुळे विकासाचा वेग वाढतो. तथापी जिल्ह्यात अद्ययावत विमानतळाद्वारे प्रवासी व माल वाहतुकीची विमान सेवा सुरू झाली तर विकासाचा वेग तिप्पट होतो असे स्पष्ट करुन मुख्यमंत्री म्हणाले की, चिपी विमानतळाच्या परवानग्या मिळविण्यासाठी अनेक अडचणी होत्या. पण, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी विशेष परिश्रम घेऊन या विमानतळाच्या परवानग्यांचा मार्ग सुकर केला. त्याबाबत ते अभिनंदनास पात्र आहेत. चिपी विमानतळ हा पर्यायी विमानतळ म्हणूनही उत्तमप्रकारे काम करु शकेल, असे ते म्हणाले. आज एअरपोर्ट थॉरेटी ऑफ इंडिया व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात रत्नागिरी जिल्ह्याच्या विमानतळाबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षर्‍या झाल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील विमानतळासही आता चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

-सी वर्ल्ड प्रकल्प लवकरच मार्गी लावणार

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासास चालना देणारा सी वर्ल्ड प्रकल्प रेंगाळला होता. पण जिल्ह्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वपूर्ण असल्याचा उल्लेख करुन मुख्यमंत्री म्हणाले की, हा प्रकल्प सहा महिन्यात मार्गी लावण्याचा प्रयत्न करु. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे. ते पुढे म्हणाले भारतातील पहिल्या सागरी बहुप्रजातीय मत्स्यबीज केंद्र वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथे होत आहे. यामुळे जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायामध्ये मोठे आर्थिक परिवर्तन होण्यास मदत होणार आहे. देवगड तालुक्यातील आनंदवाडी मासेमारी बंदराच्या निर्माणामुळे मत्स्य व्यावसायिकांना याचा मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे.

-22 हजार कोटींचे प्रकल्प हाती   कोकणाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासनाच्या माध्यमातून कोकण विभागात 22 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प हाती घेतल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, मत्स्यव्यवसाय विभागामार्फत दोनशे पंधरा कोटी रुपयांच्या विविध विकास योजना राबविण्यात येत आहेत. सिंधुदुर्गच नैसर्गिक सौंदर्य कायम रहावं यासाठी प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक उद्योग या जिल्ह्यात कसे येतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नीलक्रांती, सागरमाला या केंद्राच्या योजनांशी सांगड घालत मत्स्यव्यवसाय विभागाने कोकणच्या किनारपट्टीवर विविध विकासकामे सुरू केली आहेत.

Check Also

आमदार महेश बालदींच्या उपस्थितीत विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांचे सक्षम नेतृत्व मान्य करून व विकासात्मक धोरणावर …

Leave a Reply