Breaking News

कुंभमेळ्यातील सफाई कर्मचार्यांसाठी 21 लाखांची मदत

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:च्या बचतीमधील 21 लाख रुपये कुंभमेळ्यातील सफाई कर्मचार्‍यांसाठी मदतनिधी म्हणून दिले आहेत. कुंभमेळ्यात कार्यरत असलेल्या संस्था, संघटना आणि कार्यकर्त्यांच्या नियोजनाबद्दल मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले आहे. तसेच हा कुंभमेळा पुढील कित्येक वर्षांसाठी प्रेरणादायी अन् ऊर्जा देणारा ठरेल, असेही मोदींनी म्हटले.

उत्तर प्रदेशातील सर्वच जनतेचं अभिनंदन, विशेषत: प्रयागराज येथील नागरिकांचं. प्रयागराज येथील कुंभमेळ्यात कार्यरत असलेल्या प्रत्येक घटकाचे मोदींनी कौतुक केले आहे. प्रयागराज येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारच्या नेतृत्वात कार्यरत असलेल्या सर्वच टीमचे मोदींनी कौतुक केले आहे. या कुंभमेळ्यातून जगाला भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले आहे. तर, पुढील कित्येक वर्षांसाठी या कुंभमेळ्यातील उत्साह आपणास प्रेरणा आणि ऊर्जा देणारा ठरेल, असेही मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे. प्रयागराज कुंभमेळा हा ऐतिहासिक ठरला आहे. या महामेळ्याची व्याप्ती पाहता स्वच्छता अन् भाविकांच्या आरोग्यासंदर्भात घेतलेली दक्षता ही विक्रमाची नोंद करणारी असल्याचे मोदींनी म्हटले. या कुंभमेळ्यात स्वच्छता करणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या सर्वाधिक असल्याचा विक्रम नोंद झाला आहे. तसेच दळणवळण आणि कलाप्रदर्शाचाही विक्रम नोंद असून या महामेळ्यासाठी वापरण्यात आलेलं आधुनिक तंत्रज्ञान हे प्रशंसनीय असल्याचंही मोदींनी म्हटलं आहे. दरम्यान, 24 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुंभमेळ्याला भेट देऊन गंगा नदीत पवित्र स्नान केले होते. त्यानंतर, मोदींनी कुंभमेळ्यात कार्यरत असलेल्या सफाई कर्मचार्‍यांचे पाय आपल्या हातांनी पुसले होते. त्यानंतर आता मोदींनी कुंभमेळ्यातील कर्मचार्‍यांच्या कल्याणासाठी असलेल्या संस्थेला 21 लाख रुपयांची मदत दिली आहे. विशेष म्हणजे मोदींनी ही मदत त्यांच्या स्वत:च्या बचतीमधून दिली आहे.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply