पनवेल : वार्ताहर
येथील महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांसाठीच्या विविध शाळांतील विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धा खारघर येथे आयोजित करण्यात आली होती. महापालिकेच्या दिव्यांग कल्याण योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या या स्पर्धेस प्रतिसाद लाभला.
स्पर्धेचे उद्घाटन महापालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील यांच्या हस्ते झाले. उद्घाटन समारंभास महापालिकेचे उपायुक्त संजय शिंदे, सहाय्यक आयुक्त तेजस्विनी गलांडे, हावरे उद्योग समूहाचे संजय हावरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तर महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख यांनी या क्रीडा स्पर्धेला व सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे विशेष कौतुक केले.
या स्पर्धेत एस. एच. दिव्यांग सेंटर विशेष शाळा खारघर, रोटरी क्लब कर्णबधिर मुलांची विशेष शाळा, भारतीय मानव विकास ट्रस्ट गतिमंद मुलांची शाळा आदी सहा शाळांचे सुमारे 400 दिव्यांग विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार 100 मीटर, 80 मीटर व 50 मीटर धावणे, लिंबू चमचा, सॅक्रेस, गोळाफेक, सॉफ्ट बॉल आदी खेळांचे नियोजन करण्यात आले होते.
स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविलेल्या खेळाडूंना चषक, सुवर्णपदक व विशेष प्राविण्य प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले, तसेच सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्रे देऊन प्रोत्साहित करण्यात आले.
या स्पर्धेला नगरसेवक निलेश बावीस्कर, नगरसेविका नेत्रा पाटील, शाळांच्या शिक्षिका स्वाती खरे, नीता स्वामी, चेतना पाटील, इतर मान्यवर तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष शिक्षक दत्तू कांबळे व वाचा उपचार तज्ज्ञ संजय होन यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. या वेळी दिव्यांग विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर गीतावर मनमोहक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.