अलिबाग : प्रतिनिधी
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्ण मयत होण्याच्या संख्येतही वाढ होत आहे. या पार्श्वभूमीमवर आनंदाची बाब म्हणजे कमी वजनाच्या तीन नवजात बालकांना अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञांनी जीवदान दिले आहे. तीनही बालकांवर उपचार करून त्यांचे वजन वाढल्यानंतर त्यांना सुखरूप घरी सोडण्यात डॉक्टरांना यश आले आहे.
अलिबागच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात 19 मार्च रोजी माही संजय जाधव (रा. विघवली, ता. माणगाव) या प्रसूतीसाठी दाखल झाल्या होत्या. त्या प्रसूत होऊन त्यांनी बाळाला जन्म दिला. मात्र बालकांचे वजन अवघे 700 ग्राम होते. त्याचबरोबर अलिबाग बंदरपाडा येथील रुबिना सिद्दीकी याच्या नवजात जुळ्या मुलांचे वजनही कमी असल्याने ही तीनही बालके नवजात बालक कक्षात दाखल करण्यात आली होती. जुळ्या मुलांपैकी एकाचे वजन 955 ग्राम व दुसर्या मुलाचे वजन 1 किलो 200 ग्राम होते.
कमी वजनाच्या या तीनही बालकांवर जिल्हा रुग्णालयातील नवजात बालक कक्षात डॉक्टर, परिचारिका यांनी महिनाभर योग्य उपचार केले. तीनही बालकांना व्हेंटिलेटरची गरज होती. कोविड परिस्थितीत इतर रुग्णालयातही या बालकांवर उपचार झाले नाहीत. जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर नसल्याने नवजात कक्षात असलेल्या सिपॅप मशीनवर बालकांना ठेवण्यात आले. बालरोगतज्ज्ञांनी नातेवाईकांना बाळांची परिस्थिती सांगून दुसर्या रुग्णालयात नेण्यास सांगितले. मात्र नातेवाईक नेण्यास तयार नव्हते.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. महालिंग क्षीरसागर, डॉ. सागर खेदू यांच्यासह परिचारिका यांनी बाळांवर उपचार करून त्याचे वजन वाढविले. बालकांचे योग्य फिडींग परिचारिकांनी केले, त्यांना वेळेवर औषधोपचार, खाणे दिल्याने बाळांचे वजन वाढण्यास मदत झाली. 700 ग्राम वजनाच्या बालकाचे वजन एक किलो 100 ग्राम, 955 ग्राम वजनाच्या बालकाचे वजन एक किलो 200 ग्राम तर एक किलो 200 ग्राम वजनाच्या बालकाचे वजन एक किलो 400 ग्रामने वाढले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका यांनी योग्य उपचार केल्यानंतर 23 एप्रिल रोजी या तीनही बालकांना घरी सोडण्यात आले. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, डॉ. अनिल फुटाणे, डॉ. महालिंग क्षीरसागर, डॉ. सागर खेदू, परिचारिका आदी उपस्थित होते.