Breaking News

कर्जत-खोपोलीच्या प्रवाशांना पुन्हा प्रतीक्षा

कर्जत, खोपोली, नेरळच्या प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी पर्यायी मार्ग नाहीत. असे असताना नवीन उपनगरीय सेवेत वाढ करण्याऐवजी मध्य रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. त्यावेळी पनवेलमार्गे मुंबईत लवकर पोहचण्याची शक्यता असताना त्या मार्गावर उपनगरीय लोकल किंवा शटल सेवा सुरू करण्यासदेखील मान्यता देत नाही. असे असताना रेल्वे प्रशासनाला बदलापूरच्या पुढे लोकसंख्या वाढत नाही का, असा प्रश्न गाड्यांच्या संख्येत वाढ होत नसल्याने म्हणायची वेळ येऊन ठेपली आहे. किमान ठाणे ते कर्जत, कल्याण ते कर्जत आणि खोपोली लोकल गाड्या सुरू करणे फारच आवश्यक होऊन बसले आहे.

काही वर्षांपूर्वी खोपोली आणि कर्जत, नेरळकर प्रवासी बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, ठाणे या ठिकाणी उतरू शकत नाही. साधारण दहा वर्षांपूर्वी कर्जत येथून कल्याण किंवा ठाणेपर्यंत कधीही जाणे सहज शक्य होते. कारण पूर्वी लोकल गाड्यांना एवढी गर्दी होत नव्हती, परंतु आजघडीला कर्जत, खोपोली, नेरळ या भागातील सकाळी लोकल गाडीने अंबरनाथ किंवा कल्याण किंवा ठाणे जाणे अशक्य होऊन बसले आहे. कारण कर्जत लोकल सीएसएमटीपर्यंत असल्यामुळे या लोकल गाड्यांमध्ये बदलापूर,  अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, ठाणे इत्यादी स्थानकांत चढणार्‍या प्रवाशांची गर्दी असते. यामुळेच खोपोली किंवा कर्जतचा प्रवासी उतरूच शकत नाही. नोकरीनिमित्त नाइलाजास्तव रोज जाणार्‍या प्रवाशांना कल्याण किंवा ठाण्याला उतारताना अक्षरशः जीव मुठीत घेऊन उतरावे लागत आहे. त्यावेळी खरी कसोटी असते ती विद्यार्थ्यांची. कारण बरीच खोपोलीपासून नेरळपर्यंतचे विद्यार्थी शिक्षणासाठी उल्हासनगर किंवा कल्याणला जात असतात. हे विद्यार्थी सकाळी चक्क लोकलच्या दरवाजात उभे राहूनच प्रवास करतात. काही वेळा तर विद्यार्थी गर्दीमुळे उल्हासनगर किंवा कल्याणला उतरू शकले नाहीत अशी बरीच उदाहरणे आहेत, परंतु रोज न जाणारे किंवा महिलांना किंवा वयस्करांना किंवा लहान मुलांना बदलापूर किंवा अंबरनाथ किंवा कल्याण किंवा ठाणेला जायचे असल्यास ते सकाळच्या वेळी जाऊच शकत नाहीत. या सगळ्या होणार्‍या त्रासापासून कर्जतच्या प्रवाशांची मुक्तता व्हावी, अशा मागणीसंदर्भात रेल्वे प्रशासनास कर्जत-कल्याण किंवा ठाणे अशी शटल सेवा सुरू करून कर्जतकडे येणार्‍या प्रवाशांचा त्रास कमी होण्यात मदत होऊ शकते. त्यामुळे खोपोली, कर्जत, कल्याण, ठाणे अशी शटल सेवा सुरू केल्याने फक्त कर्जत भागातील नाही तर बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, ठाणे यांनासुध्दा फायदा होऊ शकतो. त्यासाठी जर खोपोली-कर्जत-कल्याण-ठाणे अशी शटल सेवा सुरू केल्यास खोपोली-कर्जत या भागातील प्रवासी यांना बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, ठाणेपर्यंत प्रवास करू शकतील.

वरील सर्व स्थानकांत होणारी गर्दी ही कर्जत ते सीएसएमटीदरम्यान धावणारी उपनगरीय लोकलमधून प्रवास करण्याचे टाळतात हे दिसून आले आहे. तसेच आता ज्या प्रवाशांना बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, ठाणे येथे उतरताना जो त्रास होतो तो होणार नाही. कारण  बदलापूर, अंबरनाथ, कल्याण वा ठाणे येथे उतरणारे प्रवासी फारच कमी असतील. त्यासाठी कर्जत ते कल्याण किंवा ठाणे लोकल शटल सेवा सुरू करणे आवश्यक आहे. भयंकर गर्दीमुळे व त्या अनुषंगाने गाड्या न वाढवल्याने कर्जत भागातील प्रवाशांना कल्याण किंवा ठाण्याला उतरणे अशक्य झाले आहे. त्यासाठी जर कर्जत ते ठाणेदरम्यान उपनगरीय लोकल गाडी चालवण्यासाठी कल्याण ते ठाणेच्या दरम्यान पाचवी आणि सहावी रेल्वेलाईन टाकण्याचे काम जलदगतीने करण्याची आवश्यकता आहे. कर्जत येथून मुंबईला जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून कर्जत-पनवेल रेल्वेमार्गाची निर्मिती केली आहे, मात्र या मार्गावर 10 वर्षांत शटल सेवा काय किंवा उपनगरीय लोकल गाड्यांना सुरुवात झाली नाही. या मार्गावर लोकल सुरू झाल्या तरी कर्जत, नेरळ, खोपोलीच्या प्रवाशांना फायदा होऊ शकतो. त्याचवेळी मध्य रेल्वेच्या मेन लाईनशिवाय पर्यायी मार्गदेखील उपलब्ध होऊ शकतो आणि गर्दीच्या वेळी प्रवाशांना सुखकर प्रवास करता येऊ शकतो.

-संतोष पेरणे, खबरबात

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply