उरण ः रामप्रहर वृत्त
रविवार सुटीच्या दिवशी संकष्टी चतुर्थीनिमित्त चिरनेरच्या महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांचा महासागर लोटला होता.
गजाननाची रूपे अनेक तशीच त्याची तीर्थस्थळे विविध ठिकाणी वसली आहेत. कोकण भूमीत गणरायाची अनेक स्वयंभू स्थाने आहेत. त्यापैकी रायगड जिल्ह्यातील चिरनेर येथे असणारे महागणपतीचे जागृत स्थान सर्वांना परिचित झाले आहे.
उरण तालुक्यात असणारे चिरनेर हे एक निसर्गसंपन्न ऐतिहासिक गाव आहे. 1930 साली इंग्रज राजसत्तेविरुद्ध झालेल्या जंगल सत्याग्रहाचा जाज्वल्य ऐतिहासिक वारसा या गावाला लाभला आहे. अठरापगड जातीधर्माची वस्ती असणार्या या गावाचे महागणपती हे ग्रामदैवत आहे. शिलाहार राजवटीच्या कालखंडातील ही गणेशमूर्ती पेशव्यांचे सरदार रामजी महादेव फडके यांनी बांधलेल्या भव्य पाषाणी मंदिरात स्थानापन्न आहे.
महागणपतीची मूर्ती पूर्वाभिमुखी असून पाषाणी, शेंदूरचर्चित आहे. सुमारे सहा फूट उंच, साडेतीन फूट रुंद अशा चतुर्भुज मूर्तीच्या हाती खड्ग व पाश आहेत. मूर्ती पद्मासनात विराजमान आहे. महागणपतीच्या दर्शनार्थ मंदिरात भाविकांची नेहमी गर्दी असते. माघी गणेशोत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. संकष्टी चतुर्थीला मंदिरात भाविकांची मांदियाळी भरलेली असते. नवसाला पावणारा गणपती
म्हणून ख्याती असलेल्या या गणरायाच्या दर्शनाला रविवारी संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर भक्तांचा महासागर लोटला होता.