मोहोपाडा ः वार्ताहर
कार्तिकी एकादशीनंतर येणार्या मोक्षदा एकादशीला पूर्वीपासून होणारी बारवई पोयंजे येथील डोंगरमाथ्यावर असणार्या विठ्ठल रखुमाई मंदिरात जिल्ह्यातील चौर्यांऐशी गावांची यात्रा मोठ्या उत्साहात झाली. या वेळी यात्रेतील पाळणे, थाटलेली दुकाने आदीसह आनंद लुटण्यासाठी लहानग्यांसह तरुणाईंची मोठी गर्दी दिसून आली.
बारवई गावची दीड दिवसाची यात्रा ही सर्वांना परिचित असून या यात्रेत मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी दिसून येते. बारवई गावालगतच्या डोंगरमाथ्यावर विठ्ठल रखुमाई मंदिर आहे. या मंदिरात मोक्षदा एकादशीला विविध कार्यक्रम होऊन या मंदिरापासून बारवई गावापर्यंत रस्त्यावर यात्रेनिमित्त विविध दुकाने थाटण्यात येतात.
या वेळी भक्तांचे लक्ष वेधण्यासाठी मंदिराच्या सभामंडपात दरवर्षी रांगोळीकार रवींद्र चंदन चौधरी यांच्याकडून आकर्षक रांगोळी रेखाटली जाते. यात्रेतील पाळणे, थाटलेली दुकाने आदी पाहून लहानथोर आनंद लुटतात. यानिमित्ताने रात्री आठनंतर विठ्ठल रखुमाई मंदिरातून बारवई गाव अशी वारकरी मंडळींकडून हरिनामाच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात येते. बारवई येथील यात्रेत जिल्ह्यातील विविध भागातून आनंद लुटण्यासाठी नागरिक येत असतात.