मुरूड : प्रतिनिधी
नौदल, तटरक्षक दल आणि वसंतराव नाईक महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जंजिरा किल्ल्यात स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली.
ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यास दरवर्षी सुमारे साडेपाच लाख पर्यटक भेट देतात. हे पर्यटक सोबत प्लास्टिक पाणी बॉटल, प्लास्टिक डबे अथवा अन्य सामुग्री आणतात. आपला कार्यभार उरकताच ते त्या सर्व वस्तू किल्ल्याच्या अडगळीच्या भागात टाकून जात असतात. हा ऐतिहासिक किल्ला स्वच्छ व सुंदर राहावा यासाठी तटरक्षक दल आणि नाईक महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने किल्ल्यात स्वच्छता मोहीम राबविली. त्यात तहसीलदार गमन गावित, नायब तहसीलदार रवींद्र सानप, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सुबनावळ, माजी सभापती नीता गिदी, कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष म्हात्रे, डॉ. मुरलीधर गायकवाड यांच्यासह नौदलाचे कमांडंट, तटरक्षक दलाचे कमांडंट, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे कर्मचारी आणि नाईक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी किल्ल्यातील प्लास्टिक कचरा गोळा करून तो एका पिशवीत भरला तसेच त्याची योग्य विल्हेवाट लावली.
किल्ले प्रेरणा देण्याचे काम करतात. त्यांच्यापासून मानवाला स्फूर्ती मिळते. अशा ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता करणे हे आम्ही आमचे भाग्य समजतो.
-ए. खान, डेप्युटी कमांडंट, तटरक्षक दल, मुरूड