Breaking News

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 24 तास सुरू -जिल्हाधिकार्यांचे आदेश

अलिबाग ः जिमाका : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू झाले असून उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी नागरिकांसाठी विविध नियम व उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जीवनावश्यक वस्तूंची जी दुकाने उघडी ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे, त्यांनी आपली दुकाने 24 तास चालू ठेवावीत, असे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यात शासकीय व खासगी बायोमेट्रिक अटेंडन्स बंद ठेवण्याचे आदेशही दिले आहेत. गटविकास अधिकार्‍यांना गावनिहाय व मुख्याधिकार्‍यांनी  वॉर्डनिहाय कर्मचार्‍यांची नेमणूक करावी. जे वयोवृद्ध नागरिक आहेत, ज्यांना कोणाचाही आधार नाही व दिव्यांग अशा लोकांसाठी त्यांना लागणारे जीवनाश्यक साहित्य पुरवावे.  याशिवाय भाजी विक्रेत्यांना मंडईच्या जागा नेमून द्याव्यात, असे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. 

बँकिंग व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी सर्व बँक मॅनेजर मुख्यालय स्थळी थांबतील, असे आदेश देण्यात आले असून सर्व एटीएम व्यवस्थितपणे सुरू राहतील व लोकांना पैसे मिळतील यासाठी बँक कर्मचार्‍यांनाही तसे आदेश देण्यात आले आहेत. एसबीआयच्या जिल्हा प्रमुखांना तसेच महाडच्या एसबीआय मॅनेजर यांना ते गैरहजर असल्यामुळे व एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे  जिल्हा दंडाधिकार्‍यांकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

येत्या एक-दोन दिवसांत जीवनावश्यक वस्तूंचा सुरळितपणे पुरवठा सुरू होईल. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जनतेला केले आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply