Breaking News

आजची भारतीय महिला स्थिती व आशा

नारी शक्तीचा महिमा आणि महत्त्व स्पष्ट करण्यासाठी संस्कृतमध्ये एक चांगले सुभाषित सांगितले आहे. यत्र नार्यस्तु पूज्यते। रमन्ते तत्र देवता:। अर्थात जेथे स्त्रीचा सन्मान होतो, तेथे साक्षात देव-देवतांचे वास्तव्य् असते! भारत देशात नारीशक्तीची पूजा प्रस्तृत केली आहे.  आजच्या आधुनिक कालखंडात महिला दिन साजरा करण्याच्या निमित्ताने व हे औचित्य साधून महिलांना स्वावलंबी करण्याची,  त्यांचा सन्मान करण्याची व त्यांना समाजात हक्कांचे स्थान देण्याची सातत्याने चर्चा होते. अर्थात आजच्या स्त्रीला हे गुणगाण बरे वाटत असले, तरी देवार्‍ह्यातील पूजा होण्यापेक्षा तिच्या गुणांचा आदर व्हावा व गुणांची दखल घेऊन स्त्रीला मान मिळावा ही तिची प्रामाणिक इच्छा आहे. स्त्रीकडे असलेल्या नेतृत्व गुणांसाठी, तिच्याकडील क्षमतेसाठी तिला समानतेची वागणूक मिळावी अशी तीव्र इच्छा व अपेक्षा असते. सबलीकरणाचे एक प्रतीक एवढेच पूजात्माक प्रतिक बनवून राहण्यापेक्षा तिच्या ताकदीची व क्षमतांची दखल घेऊन तिचे प्रत्यक्षात सबलीकरण होऊन तिला समानतेचे स्थानन मिळावे, अशी आजच्या स्त्रीची योग्य व न्याय अपेक्षा असते, परंतु हे सबलीकरण प्रत्यक्षात कसे उतरणार, कधी व कोणत्या वातावरणात ते होणार, हा खरा प्रश्न आहे. जोपर्यंत समाजात खोलवर रुतलेले पूर्वग्रह तसेच आहेत व ते मुळापासून उपटून फेकून देणारे सामाजिक मन तयार होत नाही, तोवर ते शक्य नाही, म्हणून एका पूर्वापार चालत आलेल्या, प्रतिमेतून स्त्रीला समाजच बाहेर काढीत नाही व त्यांच्या क्षमतांनुसार त्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करून देत नाही, तोपर्यंत उद्घोषित असे हे स्त्री सबलीकरण शक्य नाही, म्हणजेच खर्‍या अर्थाने ‘महिला दिन’ साजरा करणे शक्य नाही व एक माता म्हणून ‘आई’ म्हाणून तिचे महत्त्व नेहमीच सर्वमान्य आहे, परंतु या स्त्रीला, मातेला होणारा त्रास, तिचे कष्ट अन् तिची कुचंबणा कशी कमी होईल हे समाजाने सर्वसंमतीने वा सार्वजनिकरीत्या ठरविले व करविले, तरच स्त्रीच्या सामाजिक महत्त्वाला काही न्याय हिताच्यासारखे होईल हे उघड आहे.

स्त्री एका वेळी अनेक भूमिका निभावत असते, ती पत्नी म्हणून घरच्या सर्व जबाबदार्‍या पेलते, मुलांची माता म्हणून त्यांना मोठे करण्यासाठी राबते व कुटुंबांच्या विकासात स्वतःला संपवून टाकते. तिच्या या त्यागाची व कष्टाची कुटुंबीयांनी व समाजाने सतत जाणीव ठेवली पाहिजे. सर्वांनी तिच्या कामात तिला हातभार लावून सर्व कुटुंबांचे व तिचे स्वतःचे संतुलन साधण्यानेच तिला आत्मविश्वास मिळू शकतो हे ओळखले पाहिजे. आज महिला आपल्यास कौटुंबिक उद्योगात, कामकाजात मोलाचे सहकार्य देत आहे, सुशिक्षित महिला कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडून अर्थार्जन करीत आहेत. स्वततःचे छोटे-मोठे उद्योग सुरी करीत आहेत. या परिस्थितीमध्ये तिच्या गुणांना न्याय देण्याची जबाबदारी सर्व कुटुंबांची, तसेच समाजाची आहे.

स्त्री वर्गाच्या सन्मानाची भारतातील परंपरा फार मोठी आहे. गार्गी, मैत्रेयीपासून तर माता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, डॉक्टर आनंदीबाई जोशी आणि त्यानंतरही ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. रूढी परंपरांच्या अतिरेकातून व समाज मनावरील सनातनी प्रवृत्तीचे सावट पडले होते. त्यातून आता स्त्रीला आता स्वातंत्र्याचे वारे अनुभवण्यास मिळू लागले आहेत. हालअपेष्टांचे जीणे आता सुलभ होऊ लागले आहे. ब्रिटिश राजवटीमधून स्त्रियांना मिळालेले दोन महत्त्वाचे फायदे म्हणजे स्त्रीत शिक्षण व शिक्षणातून हळूहळू फुलत गेलेली स्त्री-पुरुष समानता. त्यामुळेच आजच्या या आधुनिक काळात, विज्ञान, तंत्रज्ञान, उच्च शिक्षण, संरक्षण, सेवा क्षेत्र, राजकारण, प्रशासन, क्रीडा, उद्योग अशा सर्व क्षेत्रात आज  महिला भरारी घेऊ लागल्या आहेत. महिलांच्या कर्तृत्वाची अनेक नेत्रदीपक उदाहरणे आपल्या आवतीभवती दिसून येत आहेत. विजयालक्ष्मी पंडित, कॅप्टन लक्ष्मीबाई सेहगल, इंदिरा गांधी, सोनिया गांधी, प्रतिभाताई पाटील या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्र पती, मीराकुमार, लोकसभा अध्यक्षा, सुषमा स्वराज्य, परराष्ट्र मंत्री, निर्मला सीतारामन, संरक्षण मंत्री अशी खूप मोठी यादी आहे. आज असे कोणतेही क्षेत्र नाही जेथे महिलांनी आपल्या कर्तृत्वाचे निशाण फडकाविलेले तरीही दुर्दैवाने आजही अनेक स्तरावर स्त्रीला दुय्यम दर्जाची वागणून दिली जाते. स्त्री-भ्रूणहत्या अजूनही पूर्णपणे संपलेली नाही. कुटुंबात अजूनही स्त्रीची दुय्यम स्थानावर केली जाणारी गणती संपलेली नाही. स्त्रीचे घरातील राबणे व नोकरीवरील वा उद्योगातील सहभाग येथे होणारी हेटाळणी अजूनही अनुभवायला मिळतेच. पुरुषवर्गाच्या मानसिकतेत अजूनही फार मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल होणे गरजेचे आहे. स्त्री अबला आहे व तिच्यावर दया म्हणून पुरुषवर्गाने तिला केवळ सहन करणे या मानसिकतेतून पुरुष वर्ग जेव्हा बाहेर पडेल व स्त्रीला न्याय हक्क म्हणून समानता देणार्‍या मानसिकतेच्या सहजपणे व सार्वत्रिक स्वीकार करेल तेव्हाच खर्‍या अर्थाने जागतिक महिला दिनाचे महत्त्व समाजाने ओळखले असे म्हणता येईल. अशा पुरुष-मानसिकता बदलाची आपण सकारात्म क भावनेने प्रतीक्षा करू या व पुढचा जागतिक महिला दिन स्त्रीला अधिक सुसह्य वाटेल अशी अपेक्षा करू या.

-डॉ. प्रीती सवाईराम, सहाय्यक प्राध्यापक, यशदा, पुणे

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply