Breaking News

मोदीमंत्राचा मथितार्थ

हे नतद्रष्ट लोक पुरावे का मागत आहेत?

भारताच्या वायुदलाने 26 फेब्रुवारीला पाकिस्तानात घुसून बालाकोट येथील आतंकवाद्यांचे अड्डे बॉम्बवर्षाव करून उद्ध्वस्त केले. ह्या विषयात काँग्रेस संस्कृती पुरावे मागत आहे. वायुदल प्रमुखांनी पाकिस्तानवर हल्ला करून तेथील काही आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त केल्याचे पत्रकारांसमोर स्पष्टपणे सांगितले आहे. तरीही राहुल गांधींपासून ते प्रतिमास मानधन म्हणून पैशाची पाकिटे ज्यांना काँग्रेस नेत्यांकडून पोचती होतात अशा तथाकथित हिंदुत्वनिष्ठ पक्षांचे खासदार आणि पदाधिकारी ह्यांना पुरावे हवे आहेत. सामान्य माणसाला पुरावे नको आहेत. हल्ला झाला आणि तळ उद्ध्वस्त झाले हे त्याला पटते. कारण त्याचे तर्कशास्त्र सोपे आहे. भारताने वायुदलाच्या वतीने आपल्या सामर्थ्याचे रौद्र स्वरूप प्रगट केले नसते, तर पकडल्यानंतर 60 तासाच्या आत पाकिस्तानने भारतीय वायुदलाचा वैमानिक अभिनंदन वर्धमान ह्याला सुखरूप परत केले नसते. भारताने मागणी केली आणि पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मद ह्या आतंकवादी संघटनेच्या अनेक पाइकांना अटक केली असे ह्यावेळी घडले. हा पुरावा सामान्य माणसाला पुरेसा वाटतो. कारण पूर्वी कधी असे घडलेले त्याने पाहिले नव्हते. काँग्रेसने जवळ जवळ 70 वर्षे राज्य केले, पण 71च्या युद्धाचा अपवाद केला, तर भारताचा आवाज पाकिस्तानच्या आवाजापेक्षा मोठा झाला आहे असे दृश्य कधी ऐकायला आणि पाहायला मिळाले नाही. आज मोदी गर्जना करीत आहेत आणि इम्रान खान चाचरत बोलत आहे. मोदी सांगत आहेत आणि इम्रान ऐकतो आहे असे पाहायला मिळत आहे. सामान्य माणसाला तेवढे पुरेसे आहे. कारण त्याचा आपल्या सैन्यावर विश्वास आहे, आपल्या सैनिकांनी जे केले त्याचा त्याला आनंद आणि अभिमान आहे आणि सगळ्याच गोष्टीचे पुरावे मागायचे नसतात हे त्याला कळते. आईवर त्याचा विश्वास असतो. आपले वडील कोण ह्यावर तो पुरावे मागत बसत नाही.

युद्ध म्हणजे क्रिकेटचा सामना नव्हे. पहिला ते शेवटचा चेंडू कसा टाकला आणि मारला जातो त्याचे थेट प्रक्षेपण आपण त्याच वेळी निर्धोकपणे बघू शकतो. तसे आपले सैनिक घरातून कधी बाहेर पडले आणि कामगिरी फत्ते करून कधी परतले हे विगतवार सांगायचे म्हटले, तर त्याने शत्रूचा अधिक लाभ होईल आणि भविष्यातील आपला विजयाचा मार्ग अवघड होईल हे सामान्य माणसाला कळते. मग काँग्रेस संस्कृतीतील नेत्यांना आणि काही हिंदुत्वनिष्ठ पक्षातील त्यांच्या पगारी हस्तकांना कळत नसेल असे कसे म्हणता येईल? तरी ते पुरावे मागत आहेत कारण पाकिस्तानला नमविण्यात आले ह्याचा त्यांना आनंद झालेला दिसत नाही. पाकिस्तानला आपले म्हणणे मान्य करायला लावण्यासाठी भारताने सैनिकी बळाचा वापर केला हा त्यांना विश्वासघात वाटतो. भारताचे जे संरक्षणविषयक आणि परराष्ट्र व्यवहारविषयक धोरण गांधींच्या प्रेरणेने नेहरूंनी घडविले आणि घोटून घेतले त्यापासून नरेंद्र मोदी दूर जात आहेत हे काँग्रेस संस्कृतीचे मुख्य दुखणे आहे. मोदींचे सरकार नुसते निषेधाचे खलिते पाठवून थांबत नाही, तर पाठोपाठ लढाऊ विमाने पाठवून बॉम्बफेकीच्या गर्जनांनी आपला संताप व्यक्त करते. हा गांधी-नेहरूंशी केलेला विश्वासघात आहे, असे काँग्रेस संस्कृतीला वाटते. प्रत्याक्रमण हाच संरक्षणाचा उत्तम मार्ग आहे हा मोदींचा विचार आहे आणि तसे ते वागत आहेत हे काँग्रेस संस्कृतीला भयंकर पाप वाटते. म्हणून ते मोदींना अडचणीत आणण्याच्या उद्देशाने पुरावे मागत आहेत. भारताचे सैन्य पुरुषार्थी आणि विजिगीषु आहे आणि भारतीयांच्या प्रखर राष्ट्रभावना कार्यान्वित होऊन आपल्या सैन्याच्या पाठीशी एकजुटीने संघटित होत आहेत हा बदल काँग्रेस संस्कृतीला नवा आहे. लोकांच्या राष्ट्रभावनेच्या नव्या आविष्कारापुढे ते हतबल झाले आहेत. म्हणून लोकमानस संभ्रमित करण्यासाठी ते हल्ला कसा केलात ते सांगा आणि पाकिस्तानचे किती लोक मारलेत त्याचा आकडा द्या, अशी उद्दाम भाषा करीत आहेत.

हिंदू धर्म, समाज आणि संस्कृती नष्ट करण्याच्या उद्देशाने भारतावर चालून आलेले मीर कासीम ते औरंगजेब हे पाकिस्तानचे आदर्श आहेत हे त्याने लपविलेले नाही. इम्रान खाननेही मराठ्यांचे ऐकणारा बहादूरशहा जाफर ह्यापेक्षा मराठ्यांशी लढणारा टिपू सुलतान आम्हाला प्रिय आहे अशा आशयाचे उद्गार पाकिस्तानी संसदेमध्ये काढले आहेत. ह्या देशाचे उदात्त भावविश्व अबाधित राहावे आणि इस्लामी आक्रमकांना ते माणुसकीशून्य करता येऊ नये म्हणून बाराशे वर्षे हिंदू तळहातावर प्राण घेऊन निर्धाराने लढले, पण त्यांची रणनीती बचावात्मक राहिली. शिवाजी महाराज रणांगणात उतरले आणि पहिल्यांदा प्रत्याक्रमण ही भारताची अधिकृत रणनीती ठरली. महाराजांनी हत्तीला विश्रांती देऊन  घोड्यावर मांड ठोकली. गनिमी कावा आचरणात आणला. मराठ्यांनी स्वराज्याबाहेर इस्लामी आक्रमकांच्या अधीन असलेल्या प्रदेशात मोहिमा काढल्या आणि बघता बघता इवल्याशा स्वराज्याचे अखिल भारतीय साम्राज्यात रूपांतर केले. हे हिंदवी स्वराज्य आहे ही शिवाजी महाराजांची घोषणा होती आणि त्यांच्या प्रत्याक्रमणाच्या रणनीतीचे काटेकोर पालन करून मराठ्यांनी इस्लामी आक्रमकांचा राजकीय प्रभाव नष्ट केला. शिवाजी महाराजांनी केवळ रणनीती बदलली नाही. त्यांनी रेनेसान्स केला. समग्र क्रांती केली. हिंदू मानसिकता सकारात्मक आणि विजिगीषु केली. प्रत्येकाला आत्मभान दिले आणि इस्लामच्या बीभत्सतेचा आणि क्रौर्याचा जो नपुंसक करणारा परिणाम हिंदू मानसिकतेवर होऊ घातला होता तो मुळापासून उपटून टाकण्याचा विडा उचलला. राष्ट्रनिर्माणासाठी जी सृजनशीलता लागते तिचा प्रादूर्भाव त्यांनी मराठ्यांत केला आणि त्याची लागण सर्व हिंदुस्थानभर झाली. आपण नवे राष्ट्र निर्माण करू शकतो हा विश्वास हिंदूंमध्ये उत्पन्न झाला.

मराठ्यांनी नवे राष्ट्र निर्माण केले, पण पारतंत्र्याचे हाडीमासी खिळलेले सर्व विकार उपटून टाकण्याचे महाकर्मकठीण लक्ष्य पूर्ण होण्याच्या आधीच इंग्रजांच्या कुटील राजनीतीला बळी पडून आपण पुन्हा पारतंत्र्यात पडलो. त्याविरुद्ध जो स्वातंत्र्य संग्राम छेडला गेला, त्यात गांधीयुग सुरू झाल्यावर आदर्श म्हणून शिवाजी महाराजांना हद्दपार करण्यात आले, मराठ्यांनी नेस्तनाबूद केलेल्या इस्लामी राजकीय शक्तीला पुन्हा जिवंत करण्यात आले आणि त्या शक्तीची इंग्रजांशी युती होऊ देण्यात आली. काँग्रेसने अहिंसा व्रत म्हणून हिंदू मानसिकतेत दृढमूल करण्याचा आटापिटा केला आणि केवळ हृदयपरिवर्तनाच्या धोरणाने इस्लामी मानसिकतेचे आदानप्रदान करावयाचे असे ठरविले. मुस्लीम लीगचे आणि महंमद अली जीनांचे हृदयपरिवर्तन न झाल्याने त्यांना पाकिस्तान सप्रेम भेट म्हणून देण्यास काँग्रेसने हिंदूंना भाग पडले. हिंदूंना सतत अपराधी ठरविण्यात मुसलमानांना न्याय दिल्यासारखे होणार आहे ह्या चुकीच्या समजुतीने नेहरूंनी स्वतंत्र भारतातील सर्व धोरणे ठरविली. परिणामी भारताची सृजनशक्ती आटली आणि योग्यता नि क्षमता असूनही भारत महासत्ता बनू शकला नाही. हिंदू-मुस्लीम समस्या फाळणीच्या वेळी जशी होती तशीच राहिली आणि ती हिंदूंच्या स्वातंत्र्यलालसेचे सतत शोषण करीत राहिली.

स्वातंत्र्यलढ्याच्या नेतृत्वाचे दोन गटात विभाजन होते. सावरकर विचार संकुल आणि गांधी विचार संकुल. शिवाजी हा सावरकरांचा आदर्श नि मुख्य प्रेरणास्थान होता. म्हणून त्यांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान आणि परंपरा निर्माण केली. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात त्यांनी दूरदर्शीपणे भारतीय सैन्यातील हिंदूंचे प्रमाण राष्ट्रीय समतोल राखला जाईल इतके वाढविले. सावरकरांनीही शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून रेनेसाँस केला. समग्र क्रांती केली. ब्रिटिश सावरकरांना ओळखून होते आणि म्हणून त्यांना ब्रिटिश साम्राज्याचा सर्वात धोकादायक शत्रू मानत होते. म्हणून जाणीवपूर्वक त्यांना दोन जन्मठेपेची शिक्षा झाली. काँग्रेसचे पाकिस्तान निर्मितीचे कटकारस्थान रोखण्यास त्यांना कमी वेळ मिळाला, पण सावरकर सदैव आशावादी आणि कधीच हार न मानणारे होते. औरंगजेबाने ह्यापेक्षा कितीतरी मोठे पाकिस्तान निर्माण केले होते ते शिवाजीने प्रत्याक्रमणाने मोडले, तसे हेही पाकिस्तान आपण मोडून काढू, असा विश्वास त्यांनी दिला.

त्या विश्वासानुसार नरेंद्र मोदी काम करीत आहेत हे काँग्रेसचे मुख्य शल्य आहे. मोदीही रेनेसाँस करीत आहेत. त्यांनी समग्र क्रांतीला वाहून घेतले आहे. त्या क्रांतीची सुरुवात स्वच्छ भारत अभियानापासून आहे आणि त्या क्रांतीचा एक महत्त्वाचा टप्पा पाकिस्तानवरील प्रत्याक्रमणात आहे. मुसलमान जसा आहे तसा म्हणजे त्याच्या पाकिस्तानी मनोवृत्तीसह हिंदूंनी स्वीकारला पाहिजे आणि अहिंसात्मक हृदयपरिवर्तनावर अतूट विश्वास ठेवला पाहिजे हा गांधी विचार संकुलाचा गाभा आहे, तर हिंदू हा मुळात उदात्त आणि सर्वसमावेशक असल्याने त्याने आत्मभान न सोडता आणि राष्ट्रहिताशी तडजोड न करता राष्ट्रनिर्माण कार्यास सर्वस्वी वाहून घेतले, तर तो जे काही निर्माण करील त्यात मुसलमान सुखी असतील हा सावरकर विचार संकुलाचा विश्वास आहे. काँग्रेस संस्कृतीला मुसलमान असे सुखी झालेले नको आहेत. म्हणून मोदींच्या विश्वासार्हतेविषयी संभ्रम निर्माण करण्याचा जंगजंग पछाडून काँग्रेस प्रयत करीत आहेत. बालाकोटच्या हल्ल्याविषयी पुरावे मागण्याचा निर्लज्जपणा हा त्यातला एक प्रकार आहे.

-अरविंद विठ्ठल कुळकर्णी

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply