Monday , February 6 2023

जागरूकतेवर भर हवा

बाल लैंगिक शोषणासंदर्भातील आकडेवारी पाहिली, तर 35 टक्के प्रकरणांत शोषण करणारी व्यक्ती ही शेजारी राहणारी होती. मित्र मंडळी, कुटुंबीय, नातेवाईक, शिक्षक, सावत्र पालक, काळजी घेणार्‍या व्यक्ती यांपैकी कुणीतरी म्हणजेच ओळखीतील व्यक्तिकडून लैंगिक शोषण झाल्याच्या तक्रारींचे प्रमाण 73 टक्के दिसते. या टक्केवारीत आश्चर्य वाटण्यासारखे अथवा नवे असे काहीही नाही. लहान मुलांना आपत्कालीन मदत पुरविणार्‍या चाइल्डलाइन या राष्ट्रीय पातळीवरील दूरध्वनी सेवेकडे 2018-19 दरम्यान आलेल्या बाल लैंगिक शोषणविषयक तक्रारींचे विश्लेषण केले असता, सर्वाधिक तक्रारी आलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा असल्याचे समोर आले आहे. अर्थात, यासंदर्भात अनेकविध पातळीवर जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याने जिथे जागरूकता अधिक, माहिती अधिक सहजपणे उपलब्ध तिथे तक्रार करण्यासाठी पुढे येणार्‍यांचे प्रमाण अधिक दिसते अशी सकारात्मक बाजूही याला असू शकते. 2018-19 या वर्षात महाराष्ट्रातून आलेल्या बाल लैंगिक शोषणाच्या सुमारे 450 तक्रारी ‘चाइल्डलाइन’ने हाताळल्या. याच कालावधीतील बालमजुरीसंदर्भातील तक्रारींचे प्रमाण पाहता, त्यात महाराष्ट्राचा क्रमांक देशात सहावा लागतो. केंद्रातील महिला व बालविकास खात्याच्या मदतीने चाइल्डलाइन ही सेवा चालवली जाते. 2018-19 या वर्षात देशभरातून लहान मुलांच्या शोषणाच्या सुमारे 60 हजार तक्रारी नोंदल्या गेल्याचे दिसते. यातील सर्वाधिक 37 टक्के तक्रारी या बालविवाहासंबंधीच्या होत्या. बालविवाह आपल्याकडे अद्याप किती मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे आणि किती प्रचंड प्रमाणात तो अल्पवयीन मुलामुलींवर लादला जात असावा हे समजण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी बोलकी आहे. शारीरिक छळाच्या तक्रारींचे प्रमाण 27 टक्के, तर लैंगिक शोषणाच्या तक्रारींचे प्रमाण 13 टक्के असल्याचे आढळून आले. भावनिक छळाच्या 12 टक्के तक्रारी नोंदल्या गेल्या, तर शाळेतील शिक्षेच्या 4 टक्के तक्रारींची नोंद चाइल्डलाइनकडे या काळात झाली. एकूण तक्रारींमध्ये सर्वाधिक तक्रारी केरळ व तामिळनाडूमधून आल्या. जिथे जागरुकता अधिक तिथेच त्याविरुद्ध आवाज उठवण्याची मानसिकता दिसते असे या क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते सांगतात. विशेषत: लैंगिक शोषण करणारी व्यक्ती सर्वसाधारणपणे आधी त्या मुलाशी गट्टी जुळवून त्याचा वा तिचा विश्वास संपादन करते. त्यामुळेच मुलांना ठामपणे नकार द्यायला शिकवणे तसेच लैंगिक शोषणाचा अनुभव वाट्याला आला तरी त्यात तुझी चूक काहीही नाही हेही मुलांच्या मनावर बिंबवणे आवश्यक असते. लैंगिक शोषण हे मुलींसोबतच मुलांचेही होत असते यासंदर्भातही जागरूकता निर्माण होण्याची गरज आहे. खाजगीपणा, वाईट हेतूने केलेला स्पर्श यासंदर्भात लहान मुलांना नकळत्या वयापासूनच जागरूक करणे आवश्यक असते. सर्व प्रकारचे अनुभव कुणाकडे मोकळेपणाने सांगता येतील यासंदर्भातही अगदी लहान वयापासून जाणीवपूर्वक मुलांना माहिती दिली गेली पाहिजे. बेपत्ता होणार्‍या मुलांची आकडेवारी पाहिल्यास हरवल्याच्या तक्रारींमध्ये 71 टक्के तक्रारी या मुलग्यांविषयीच्या होत्या. भावनिक आधार व मार्गदर्शनाची गरजही 62 टक्के मुलांमध्ये दिसून आली. यात मुलींचे प्रमाण अवघे 38 टक्के होते. अर्थात, शोषणापासून संरक्षणाची मागणी करणार्‍यांमध्ये मुलींचे प्रमाण काहिसे अधिक 56 टक्के दिसते. ही अवघी आकडेवारी आसपासच्या परिस्थितीविषयी समाजाला जागरूक करणारी आहे. लहान मुलांना हरतर्‍हेच्या शोषणापासून संरक्षण पुरवणे ही अवघ्या समाजाचीच जबाबदारी आहे.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply