Monday , February 6 2023

2019 सरताना अन् 2020मध्ये पाऊल टाकताना…

बघता बघता वर्ष सरायला आले. 2019 कधी संपत आले हे कळलेदेखील नाही. दिवस कसे भुरर्कन उडून गेले. मंगळवारी रात्री ‘थर्टी फर्स्ट’चा जल्लोष केल्यानंतर आपण सर्व जण नव्या वर्षात पर्दापण करणार आहोत. तसे पाहिले तर येणारा प्रत्येक क्षण हा जाण्यासाठीच असतो. आताचा वर्तमान उद्या भूतकाळ होऊन जातो, पण म्हणून काही कुणी जगणं सोडून देत नाही. उलट भविष्यकाळाचा वेध घेत माणूस वाटचाल करीत असतो. यालाच तर जीवन म्हणतात. यंदा विविध क्षेत्रांत प्रचंड उलथापालथ पहावयास मिळाली. त्यामुळे येणारे 2020 हे वर्ष कसे असेल याबाबत सार्‍यांनाच उत्सुकता आहे.

जगभर वेगवेगळ्या समाजातील लोक आपापल्या धर्मानुसार नववर्ष साजरे करीत असतात, परंतु जगभरात प्रमाण मानले जाणारे नववर्ष 1 जानेवारीला सुरू होते. कोणत्याही नव्या गोष्टीचे स्वागत करताना यापूर्वी जे आपण अनुभवले त्याचा धांडोळा निश्चितपणे घेतला जातो. एकविसाव्या शतकातील 2019 हे वर्ष अनेकार्थी महत्त्वाचे ठरले. सरत्या वर्षात राजकीय क्षेत्रात अनेक चढ-उतार पाहावयास मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या घोडदौडीला या वर्षी तीन राज्यांत लगाम लागला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड ही राज्ये भाजपच्या हातून गेली. अर्थात, हा रोष पंतप्रधान मोदींवर मुळी नव्हताच, तर ‘अ‍ॅण्टी इन्कम्बसी’चा तो फटका होता, जो सहा दशके देशात राजकारण केलेल्या काँग्रेसलाही अनेकदा बसलेला आहे. झालं आता लोकसभा निवडणुकीतही भाजप पराभूत होणार, असे चित्र रंगविले जाऊ लागले, पण हार मानतील

ते मोदी कसले. त्यांनी सारा देश पिंजून काढला आणि जिंकलाही!

यंदाची लोकसभा निवडणूक गाजली ती भारताने पाकव्याप्त काश्मीर (पीओके)मध्ये जाऊन केलेल्या ‘एअर स्ट्राईक’ने. याद्वारे आपल्या लष्कराने पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. वायुसेनेच्या विमानांनी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर बॉम्बवर्षाव करून सुमारे 200 ते 300 अतिरेकी पाकड्यांना यमसदनी धाडले. या कारवाईसाठी मोदी सरकारने लष्कराला मोकळीक दिली होती. सैन्याने आपले काम चोख बजावले. ‘यह नया भारत हैं. यह घर में घुसेगा भी और मारेगा भी,’ असा संदेशवजा इशारा पंतप्रधान मोदींनी ‘ना’पाक असलेल्या देशासह संपूर्ण जगाला दिला. या धडक कृतीचा लाभ भाजपला मिळाला नसता

तरच नवल. देशातील जनतेने याचे बक्षीस म्हणून मतांचे भरभरून दान दिले आणि पुन्हा एकदा मोदी सरकार केंद्रात विराजमान झाले.

महाराष्ट्रातही भाजप आणि शिवसेना यांच्या युतीला राज्यातील जनतेने सत्तेसाठी जनादेश दिला होता, मात्र मुख्यमंत्रिपदावरून युती तुटली आणि शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसशी सोयरीक जुळवून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अनपेक्षितपणे मुख्यमंत्री झाले, तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत जावे लागले. नव्या सरकारचा शपथविधी झाल्यानंतर रखडलेल्या खातेवाटप व मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाल्याचे वृत्त आहे. तो झाल्यानंतर खरी कसोटी आहे. परस्परविरोधी विचारसरणीची ही मंडळी कशी पुढे जातात हे नव्या वर्षात पाहायला मिळणार आहे, किंबहुना त्यावरच सरकारचे भवितव्य अवलंबून असेल.

वर्षभरात ज्या चांगल्या गोष्टी घडल्या त्यामध्ये नमूद करण्यासारख्या म्हणजे मोदी सरकार विविध जनकल्याणकारी योजना लागू करीत असतानाच दुसरीकडे या सरकारने भ्रष्टाचार्‍यांभोवतीचा फास आणखी आवळला. गेली अनेक वर्षे भारतात भ्रष्टाचार बोकाळला होता. काँग्रेसच्या काळात तर सत्ता म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण बनले होते. याच कारणावरून अनेक बड्या मंत्र्यांना जेलची हवा खावी लागली. परिणामी काँग्रेस पक्ष केंद्रातून पायउतारही झाला. ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ ही घोषणा देत सत्तेवर आलेल्या पंतप्रधान मोदींनी विदेशात फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या, हिरे व्यापारी नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांच्या देशांतर्गत मालमत्ता तर गोठविल्याच, शिवाय या आरोपींना जेरबंद करून भारतात आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची पावले उचलली. जनतेच्या पैशांची अफरातफर करणारी ही बडी धेंडं येत्या काळात आपल्या देशातील तुरुंगात दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.

एकीकडे चांगली पावले पडत असताना लैंगिक अत्याचाराच्या असंख्य घटना देशात समोर आल्या. वर्ष संपायला आले असताना हैदराबाद, उन्नावमधील घटनांनी अवघा देश सुन्न झाला. वासनांध नराधमांची वाढत चाललेली मजल गंभीर व तितकीच चिंतनीय आहे. अशातच हैदराबादमधील आरोपींचे पोलिसांकडून एन्काऊंटर झाले. त्याचे जोरदार स्वागत झाले, तसेच यावर काहींनी प्रश्नही उपस्थित केले. आपल्या देशात प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे, पण पशूलाही लाजवेल असे कृत्य करणार्‍यांना शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. त्यांना दया, माफी नको. मानवी विकृतीला जरब ही बसलीच पाहिजे, जेणेकरून पुढे असे दुष्कृत्य करण्यास कुणी धजावणार नाही.

अशीच एक हुरहूर लागून राहिली ती भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’च्या चांद्रयानाची. चंद्राकडे झेपावलेले यान शेवटच्या टप्प्यात अलगद उतरण्यात अयशस्वी ठरले आणि कोट्यवधी भारतीयांच्या हृदयाचा जणू ठोका चुकला. ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञ व वैज्ञानिकांनी

‘चांद्रयान-2’साठी खूप मेहनत घेतली होती. त्यानुसार या यानाने अचूक मार्गक्रमणही केले होते, परंतु शेवटच्या टप्प्यात विक्रम लँडर चंद्रावर वेगाने आदळला आणि यानाचा संपर्क तुटला. असे असले तरी यामुळे खचून न जाता ‘इस्रो’ने गगनयान ही नवी मोहीम हाती घेतली आहे. ती यशस्वी होईल अशी सदिच्छा आतापासूनच देऊ या.

क्रीडा क्षेत्रात भारताचा दबदबा राहिला. क्रिकेटमध्ये विराट अ‍ॅण्ड कंपनीने विजयाची मालिका कायम राखताना अनेक विक्रमांना गवसणी घातली. वूमन टीम इंडियाच्या हरमनप्रीत कौर, मिताली राज यांचीही चमक दिसून आली. अन्य खेळांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचा बोलबाला राहिला. पी. व्ही. सिंधू, (टेनिस), मेरी कोम (बॉक्सिंग), द्युती चंद, हिमा दास (धावणे), फोगट भगिनी (कुस्ती) यांनी वर्ष गाजविले, तर सिनेसृष्टीत अनेक स्टारकिड्सचा उदय झाला. नवोदित तारे-तारका रूपेरी पडद्यावर आगमन करीत असताना सलमानचा काहीसा अपवाद वगळता खान बंधू बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवू शकले नाहीत. त्या तुलनेत रणबीर कपूर, टायगर श्रॉफ भाव खाऊन गेले. अभिनेत्रींमध्ये श्रद्धा कपूर, आलिया भट यांनी बाजी मारली.

मंडळी, यंदा सर्वांत करामत केली ती निसर्गाने. या वर्षी अतिवृष्टी व वादळांनी सर्वांनाच हैराण केले. पश्चिम महाराष्ट्र, कोकणात तर महापुराने थैमान घातले. यात अनेकांचा मृत्यू झाला. वित्तहानीही मोठ्या प्रमाणावर झाली. कित्येकांचे संसार उद्ध्वस्त होत असताना त्याहीपेक्षा जास्त हात मदतीसाठी सरसावले. अनेकांनी खारीचा वाटा उचलला. यातून माणुसकीचे दर्शन घडले.

एकंदर यंदाच्या वर्षात चांगले-वाईट अनुभव आले. मंडळी, काळ कुणासाठी थांबत नसतो. त्याची परिक्रमा ही सुरूच असते. काळाच्या उदरात काय दडले आहे हे कुणाला सांगता येत नाही, पण आपण आज जे काही पेरतो ते उद्या उगवणार असते. म्हणूनच 2019ला निरोप देऊन 2020चे स्वागत करताना प्रत्येक पाऊल सारासार विचार करूनच टाकायला हवे. एकवेळ काही चांगले करता आले नाही तरी चालेल, मात्र दुसर्‍याला नाहक त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली पाहिजे. मानवी जीवन म्हणजे प्रत्येकाला मिळालेले एक सुंदर ‘गिफ्ट’ आहे. त्याचा निखळ आनंद घ्या आणि इतरांनाही तो घेऊ द्या. उद्याचं कुणी बघितलंय!

-समाधान पाटील (मो. क्र. 9004175065)

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply