नऊ ठिकाणी होणार कोरोनाविषयक तपासणी
अलिबाग ः प्रतिनिधी
नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यात येणार्या पर्यटकांवर निबर्धांचे सावट आहे. जिल्ह्यात दाखल होणार्या पर्यटकांची नऊ ठिकाणी कोरोनाविषयक प्राथमिक तपासणी केली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी रात्री संचारबंदी लागू असणार आहे, मात्र हॉटेल, रिसॉर्टमध्ये कोरोनाविषयक नियमांचे पालन करून नववर्ष स्वागत करण्यास मुभा देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी याबाबतचे आदेश शुक्रवारी (दि. 26) जारी केले.
नाताळ आणि नववर्ष स्वागतासाठी रायगड जिल्ह्यात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यात 25 डिसेंबर ते 5 जानेवारी या कालावधीत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री 11 ते सकाळी 6 दरम्यान पर्यटकांना सार्वजनिक ठिकाणी संचार करता येणार नाही. नदी, समुद्र किनारे या ठिकाणी एकत्र येण्यासही मज्जाव करण्यात आला आहे.
मोठ्या प्रमाणात दाखल होणार्या पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन जिल्ह्यात नऊ ठिकाणी कोरोनाविषयक तपासणी नाके सुरू केले जाणार आहेत. यात मांडवा, रेवस, खारपाडा, वडवली टोल नाका, माथेरान, वाकण फाटा, ताम्हाणी घाट, वरंध घाट, पोलादपूर शिवाजी महाराज चौक येथील चेकपोस्टचा समावेश आहे. या ठिकाणी दाखल होणार्या पर्यटकांची कोरोनाविषयक प्राथमिक तपासणी केली जाणार आहे.
जंजिरा किल्ला 2 जानेवारीपर्यंत बंद
मुरूड तालुक्यातील ऐतिहासिक जंजिरा किल्ला 25 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचे आदेश रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्याबाबतचा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सादर केला होता. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भा.दं.वि. कलम 188, 269, 270, 271 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005च्या कलम 51 सह अन्य तरतुदीनुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकार्यांनी दिला आहे.
नववर्षाचे स्वागत करताना जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचे संक्रमण वाढू नये आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. हे प्रतिबंध नागरिकांच्या हितासाठीच आहेत. त्यामुळे त्यांनी या नियमांचे काटेकोर पालन करावे.
-निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड