नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी 26 मे 2014 रोजी भारताच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून आणि त्यांनी ’अच्छे दिन’ ’सबका साथ, सबका विकास’ ही संकल्पना मांडल्यापासून त्यांच्या, पर्यायाने भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विरोधकांनी भारत खतरेमें, संविधान खतरेमें अशी बांग द्यायला सुरुवात केली. 2014च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 543 पैकी तब्बल 282 जागा पटकावल्या. 2014 ते 2019पर्यंत झंझावाती कारकीर्द गाजविल्यामुळेच 2019मध्ये 543 पैकी 303 जागा पटकावून नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत प्रचंड बहुमत हासिल केले.
हळूहळू राज्यसभेतसुद्धा राष्ट्रीय लोकशाही आघाडी बहुमतात आली. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शहा भारतीय जनता पक्षाच्या विषयपत्रिकेवरील (अजेंडा) विषय संसदेच्या दोन्ही सभागृहांत सहजरीत्या संमत करून घेऊ शकतात. 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर भारताला ’अच्छे दिन’ येण्यास सुरुवात झाली, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. कारण सुमारे 450 वर्षांपासून रखडलेल्या अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जन्मभूमीचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने पाच न्यायमूर्तींनी एकमताने दिलेल्या निर्णयामुळे मार्गी लावला. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानामुळे प्रखर झालेले जम्मू- काश्मीरसंबंधातले घटनेचे 370वे कलम रद्द करण्यासाठी मोदी सरकारमधील कणखर गृहमंत्री अमित शहा यांनी जबरदस्त पाऊल उचलले आणि लडाख तसेच जम्मू- काश्मीर केंद्रशासित करून भारतापासून वर्षानुवर्षे अलग राहिलेला भाग आपला झाला. भारताच्या नागरिकत्वाचा, नागरिकत्व नोंदणी करण्याचा कायदा संसदेच्या दोन्ही सभागृहांत संमत करवून घेत महत्त्वाचे धाडसी पाऊल उचलले. जनगणनेसंदर्भातला निर्णयही
घेण्यात आला.
या निर्णयामुळे तथाकथित डाव्या विचारसरणीची मंडळी अस्वस्थ झाली आणि स्वाभाविकपणे आदळआपट करू लागली. भारत का संविधान खतरेमें, भारताची अखंडता धोक्यात आली, भारत बचाव, संविधान बचाव, अशी कोल्हेकुई सुरू झाली. दिल्लीपासून गल्लीपर्यंत मोर्चे निघू लागले. अरे, तुम्हाला देशाची जर एवढीच काळजी वाटते ना, हा देश समस्त महापुरुषांच्या विचारांच्या मार्गावर चालावा असे वाटते ना आणि लोकशाहीच्या रथाची सत्ताधारी व विरोधी पक्ष अशी दोन चाके आहेत, असे वाटते ना? तर मग ही दोन्ही चाके व्यवस्थितपणे चालविण्यासाठी हातात हात घालून, खांद्याला खांदा लावून आणि तंगड्यात तंगड्या न घालता काम करा. भारत ही विश्वभरात महासत्ता म्हणून पुढे आणणे आणि भारताने विकासाच्या प्रशस्त मार्गावर वाटचाल करणे, हेच जर सर्वांचे एकमेव उद्दिष्ट असेल, तर मग त्यादृष्टीने योग्य त्या सूचना करून आपली विधायक भूमिका अमलात आणून दाखवा. हेच आपले कर्तव्य यासमयी असू शकते.
विरोधी पक्षांनी संविधान बचाव मोर्चा काढणे आणि त्याला तशाच पद्धतीने मोर्चा काढून सत्ताधारी पक्षाने उत्तर देणे हे समृद्ध आणि बळकट लोकशाहीचे लक्षण असले तरीही या मोर्चांमध्ये विधायक टीका अभिप्रेत आहे. कमरेखालची अथवा विखारी टीका नसावी. भारतीय निवडणूक आयोगाने मतदान यंत्रांचा उपयोग सुरू केल्यापासून काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रीय जनता दल, जनता दल युनायटेड, जनता दल सेक्युलर, आम आदमी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी अशा सर्वच पक्षांनी निवडणुका लढविल्या. कधी संयुक्त पुरोगामी आघाडी सत्तेवर आली, कधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सत्ताधारी झाली. सारेच पक्ष मतदान यंत्रांमुळेच निवडून आले ना? मग निरर्थक आदळआपट कशाला? प्रत्येक वेळी आपल्या सोयीचे असेल तेच योग्य, ही भूमिकाच मुळी चुकीची आहे.
आजमितीला भारतीय संविधान हे इतके मजबूत आहे की ते कोणीही बदलू शकत नाही. ज्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाबद्दल आपण छाती ठोकून अभिमानाने बोलत असतो त्याच डॉ. आंबेडकर यांचे नातू असलेल्या ख्यातनाम कायदेपंडित प्रकाश यशवंतराव उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची आज मोठी जबाबदारी आहे. त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले आणि नरेंद्र मोदी, रामदास आठवले यांच्या समवेत एकाच छत्राखाली येऊन भारतीय संविधानाची मजबूत सुरक्षा आणि जतन करण्यासाठी पाऊल उचलले, तर ते भारताच्या दृष्टीने एक दिशादर्शक पाऊल ठरेल. इथे आणखी एक महत्त्वाची बाब नमूद करावीशी वाटते की, नागरिकत्व कायदा, नागरिकत्व नोंदणी कायदा आणि जनगणना कायदा यासंदर्भात जनजागृती करणे आवश्यक आहे. आज नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी जी ही महत्त्वाची विधेयके संसदेच्या सभागृहात मांडली आणि ती मंजूर झाली, त्या कायद्यांविरोधात मोर्चात सहभागी होताना त्या विषयांची जाण असणे, या विषयाचा अभ्यास करून/करवून घेणे हे महत्त्वाचे आहे. केवळ मोर्चे काढून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे, दुगाण्या झाडणे याऐवजी कार्यकर्त्यांचे प्रबोधन करून कायद्यांची माहिती देशातील 133 कोटी लोकांना करून देणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे वकिलांनी, कायदेपंडितांनी, पक्षाच्या विधी व न्याय विभाग सांभाळणार्यांनीसुद्धा या जनजागृतीसाठी बाहेर पडून जनतेचे प्रबोधन करण्याची गरज आहे.
या मोर्चाच्या माध्यमातून निव्वळ गैरसमज पसरतील. असे होता कामा नये. समाजकंटकांना अशा वेळी दूर ठेवणे अगत्याचे आहे. कारण दगड मारणारा, हिंसाचार घडवून आणणारा हा कोणत्याही जातीचा नसतो, कोणत्याही धर्माचा नसतो, कोणत्याही पक्षाचा/पंथाचा नसतो. समाजातील वातावरण बिघडविणे हा एकमेव उद्देश घेऊन तो यात सामील झालेला असतो. डोळ्यांत तेल घालून याकडे लक्ष दिले पाहिजे. दोन्ही बाजूंनी देश बळकट करण्यासाठी, महासत्तेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी किंबहुना विकसित राष्ट्र घडविण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे असून ते आशादायक चित्र समोर येणे म्हणजेच ’भारताला ’अच्छे दिन’ येताहेत ना भौ!’ असे म्हणावे लागेल.
या पार्श्वभूमीवर दक्षिण भारतातील एक दिलासा देणारी गोष्ट समोर आली आहे. भारतात कुणाकुणाची मंदिरे होतील हे सांगता येत नाही. महानायक अमिताभ बच्चनचेसुद्धा मंदिर बनविण्यात आले आहे.
नागरिकत्व कायदा आणि एनआरसी कायदा लागू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रचंड टीका करण्यात आली, मात्र केरळच्या त्रिचीमध्ये एका शेतकर्याने चक्क मोदींचे मंदिर बांधले आहे. पी. शंकर (50) असे शेतकर्याचे नाव असून, येरकुडी गावात ते शेती करतात. पी. शंकर यांनी बचत केलेल्या पैशांतून मंदिर बांधत असल्याचे सांगितले आहे. भारतात दोन व्यक्ती अशा आहेत की ज्या राजकारणात आल्या नसत्या, तर त्या अध्यात्मिक क्षेत्रात सर्वोच्च शिखरावर पोहचल्या असत्या. एक धर्मवीर आनंद दिघे आणि दोन नरेंद्र मोदी! दिघे आज आपल्यात नाहीत, परंतु मोदी हे आज समर्थपणे भारताची सूत्रे सांभाळून कार्य करीत आहेत. असे सांगितले जाते की ते हिमालयात निघून गेले होते, पण त्यांना, ’जा, तुझ्या हातून मोठे कार्य घडणार आहे,’ असा आदेश मिळाला आणि ते भारतीय राजकारणात सक्रिय झाले. आज देशाचा राज्यशकट सांभाळण्याचे शिवधनुष्य त्यांनी लीलया पेलले आहे. याच नरेंद्र मोदी यांचे मंदिर केरळातील एका शेतकर्याने उभे केले आहे.
मोदी सरकारमुळे शौचालयाची सुविधा उपलब्ध झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजनेमुळे मी प्रभावित झालो म्हणून मी मंदिर बांधण्याचे ठरवले असल्याचे पी. शंकर यांनी सांगितले. शंकर यांच्याकडे 10 एकरची जमीन आहे. गेल्या वर्षी दुष्काळ पडला होता. त्या वेळी मी पाच एकर जागेत सुचवल्याप्रमाणे ठिबक सिंचन प्रणालीचा पर्याय निवडला. या मंदिरात महात्मा गांधी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री के. कामराज, एम. जी. रामचंद्रन, जे. जयललिता आणि मुख्यमंत्री एडप्पादी के. पलानीस्वामी यांची छायाचित्रे आहेत. या मंदिरात पी. शंकर हे दिवसातून चार वेळा आरती करतात. आहे की नाही वैशिष्ट्य. कोण काय करतो यापेक्षा त्याची भावना महत्त्वाची आहे. अशा भावनांवरच जगरहाटी चालते.
-योगेश त्रिवेदी (9892935321)