Breaking News

रायगड किल्ला रोप वे कंपनीला जिल्हाधिकार्‍यांची नोटीस

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड किल्ल्यावरील रोप वेच्या संचालक कंपनीला जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नोटीस बजावली आहे. पुरातत्व विभाग आणि संबधित यंत्रणांच्या परवानगीशिवाय रोप वे प्रकल्पाच्या क्षमतावृद्धीचे काम सुरू केल्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे. रायगड किल्ला प्राधीकरणचे अध्यक्ष खासदार संभाजी राजे यांनी या कामावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने ही नोटीस जारी केली आहे.
किल्ले रायगडावर पर्यटकांना जाण्यायेण्यासाठी मिलेनियम प्रॉपर्टीज प्रा. लिमिटेड या पुणे येथील कंपनीच्या माध्यमातून रोप वे सुविधा चालवली जाते. किल्ल्यावर येणार्‍या पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन सध्या कार्यरत असेलेल्या रोप वेची क्षमता वाढविण्यासंदर्भात तीन प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले होते. याबाबत शासन स्तरावरील समिती आणि रायगड प्राधीकरणामार्फत कोणताही अंतिम निर्णय झाला नव्हता. जिल्हा प्रशासन आणि प्राधीकरणाने कुठलीही परवानगी दिली नसतानाही रोप वेच्या संचालक कंपनीने गडाच्या पायथ्याशी परस्पर कामाला सुरवात केली होती, तसेच जिल्हा प्रशासनाला डावलून रोप वे क्षमता वाढविण्याबाबतचा प्रस्ताव थेट पुरातत्व विभागाकडे पाठविला होता. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकार्‍यांनी रोप वे कंपनीच्या संचालकांना नोटीस बजावली आहे. येत्या 48 तासांत यासंदर्भात खुलासा करावा आणि संबधित कागदपत्रे तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करावीत; अन्यथा प्रशासकीय कारवाईला तयार रहावे, असा निर्देश व इशाराही या नोटीसीत देण्यात आला आहे. खासदार संभाजी राजे यांनी नुकतीच रायगड किल्ल्याची पहाणी करून प्राधीकरणाच्या कामांचा आढावा घेतला होता. गडाच्या पायथ्याशी रोप वेच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या कामाबाबात विचारणा केली असता, संबंधीत कंपनीने त्यांना उडवाउडवीची उत्तर दिली होती. यानंतर अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या प्राधीकरणाच्या बैठकीत खासदार संभाजी राजे यांनी रोप वेच्या कामाबाबत विचारणा केली. तेव्हा प्राधीकरण अथवा जिल्हा प्रशासनामार्फत रोप वेच्या क्षमतावृद्धी कामाला परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या बेकायदेशीर कामावर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. यानंतर जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी ही नोटीस बजावली आहे.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply